मेहकर (हॅलो बुलढाणा) मेहकरच्या बहुप्रतीक्षित नवीन बसस्थानकाच्या उद्घाटनाची बातमी विविध वृत्तपत्रांमध्ये झळकली; मात्र या बातम्यांमध्ये मेहकर-लोणार मतदारसंघाचे विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात यांचा साधा उल्लेखही नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विकासकामांच्या उद्घाटनात विद्यमान लोकप्रतिनिधीचे नाव गायब होणे हा केवळ योगायोग की जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रकार, असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
आमदार सिद्धार्थ खरात हे जनतेने निवडून दिलेले विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत. कुणाला ते मान्य असो वा नसो, मतदारसंघातील अधिकृत लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची भूमिका नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत महत्त्वाच्या सार्वजनिक विकासकामाच्या बातमीत त्यांचा उल्लेख टाळला जाणे, हे समर्थकांच्या मते राजकीय हेतुपुरस्सर पाऊल असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
विकासकामे ही कोणत्याही एका नेत्याची खासगी मालमत्ता नसतात. ती शासनाच्या आणि पर्यायाने जनतेच्या पैशातून उभी राहतात. त्यामुळे उद्घाटनाचे श्रेय कुणीही एकट्याने घेण्याचा प्रयत्न करणे लोकशाही मूल्यांना धरून नाही. विशेष म्हणजे माजी आमदार झाल्यानंतरही काहींचा आमदारपदाचा मोह संपत नसल्याची कुजबूज मतदारसंघात सुरू झाली आहे. जनतेने बदल स्वीकारला असताना काहींना अजूनही आपणच विद्यमान आमदार असल्याचा भास होत आहे का, असा टोला नागरिकांकडून लगावला जात असून राजकीय कुजबूत जोरात रंगली आहे .
या प्रकारामुळे पत्रकारितेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बातमी ही सत्य, समतोल आणि वस्तुनिष्ठ असावी, ती राजकीय श्रेयाच्या गणितात अडकू नये. विद्यमान आमदारांचे नाव वगळणे हा संपादकीय निर्णय होता की त्यामागे राजकीय दबाव, याचे उत्तर जनतेला हवे आहे.
राजकीय नेत्यांनी टीका जरूर करावी; मात्र वस्तुस्थिती लपवून जनतेची दिशाभूल होणार नाही, याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी. कारण विकासकामांवर पहिला हक्क नेत्यांचा नव्हे, तर जनतेचाच असतो










