डोणगाव (हॅलो बुलडाणा) बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड Buldhana Urban Co-operative Credit Society ने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे. अपघातात निधन झालेल्या सभासदाच्या कुटुंबाला संस्थेच्या अपघाती विमा योजनेतून ३ लाख ८६ हजार १०४ रुपयांचा विमा धनादेश वितरित करण्यात आला.
कळमगव्हाण येथील सभासद श्री. प्रल्हाद पांडुरंग औताडे यांनी संस्थेकडून ३ लाख ७२ हजार रुपयांचे सुवर्ण कर्ज घेतले होते. दुर्दैवी अपघाती निधनानंतर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले होते. मात्र संस्थेच्या विमा संरक्षणामुळे संपूर्ण कर्ज माफ होऊन कुटुंबाला अतिरिक्त आर्थिक आधारही मिळाला.
हा धनादेश वितरण सोहळा २२ मे २०२६ रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, अध्यक्ष, सरव्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभागीय व्यवस्थापकांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मयत सभासदाच्या वारसदार श्रीमती निर्मला औताडे यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला.
या प्रसंगी शाखा व्यवस्थापक, ग्रामविकास अधिकारी, स्थानिक मान्यवर तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या तत्पर आणि संवेदनशील भूमिकेमुळे औताडे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाल्याने डोणगाव परिसरातून संस्थेचे कौतुक होत आहे.










