बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री. प्रकाश पाटील अवचार यांची नियुक्ती करण्यात आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी राजकीय वाटचालीत जिल्ह्यात काँग्रेसला नवचैतन्य देण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. विविध स्तरातून श्री. अवचार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
यावेळी मावळते जिल्हाध्यक्ष मा. आ. राहुलभाऊ बोंद्रे यांच्या कार्याचाही विशेष गौरव करण्यात आला. पक्षाच्या कठीण काळात सामान्य कार्यकर्त्यांना संधी देत संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कार्यकर्त्यांनी कौतुक केले. जिल्ह्यात काँग्रेसचा दबदबा कायम ठेवण्यात राहुल बोंद्रे यांचे मोठे योगदान राहिल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा. खा. मुकुल वासनिक तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. हर्षवर्धन सपकाळ यांचेही नियुक्ती प्रक्रियेसाठी आणि पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आभार मानण्यात आले. काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वामुळे आगामी काळात संघटनात्मक हालचालींना वेग येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.











