spot_img
spot_img

एनए लेआऊटचा बेकायदेशीर खेळ उघड; विहीर विकून बुजवण्याचा धक्कादायक प्रकार!

डोणगाव (हॅलो बुलढाणा) मेहकर तालुक्यातील डोणगाव परिसरात एनए लेआऊटच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर कारभाराने संतापाची लाट उसळली आहे. गट क्रमांक २२२/३ ब मधील प्लॉट क्रमांक ३२ आणि ३३ येथील जुनी विहीर लेआऊट मालकाने चक्क विकून टाकत ती बुजवण्यास सुरुवात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी स्थानिक नागरिक निलेश सदावर्ते यांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून, संबंधित विहीर ही नैसर्गिक जलस्रोत असून महसूल नोंदीत अस्तित्वात असल्याचे नमूद केले आहे. कोणतीही शासकीय परवानगी न घेता विहीर बुजवणे हा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ तसेच जलस्रोत संरक्षण नियमांचा सरळ भंग असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

स्थानिकांच्या मते, एनए लेआऊट मंजुरीदरम्यान रस्ते, नाले, विहिरी व जलवाहिन्यांचे जतन करणे बंधनकारक असताना, लेआऊट मालकाने नियम धाब्यावर बसवून थेट नैसर्गिक संपत्तीवर डल्ला मारला आहे. यामुळे भूजल पातळी धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, याच लेआऊट मालकावर यापूर्वी नैसर्गिक नाल्याची विक्री केल्याप्रकरणी तक्रारी दाखल झालेल्या आहेत. तरीही प्रशासनाने ठोस कारवाई न केल्यामुळेच अशा प्रकारांना खतपाणी मिळत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

“आधी नाला विकला, आता विहीर बुजवतोय… प्रशासन झोपलंय का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या प्रकारामुळे डोणगावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, महसूल विभागाने तक्रारीची दखल घेतली असून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, दोषींवर कडक कारवाई करून विहीर पूर्ववत करण्याची मागणी जोर धरत आहे. आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!