बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात भेसळयुक्त खवा आणि पनीर विक्रीचा घाणेरडा प्रकार उघडकीस येताच प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी भेसळखोर उत्पादक आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे स्पष्ट आदेश देत थेट इशारा दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा दूध भेसळ नियंत्रण समितीच्या बैठकीत धक्कादायक माहिती समोर आली. पाम तेल, साखर आणि स्किम्ड मिल्क पावडर वापरून बनवलेला बनावट ‘खवा’ आणि ‘चीज अॅनालॉग’ पनीर म्हणून विकला जात असल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, हे पदार्थ गुजरातमधून “स्पेशल बर्फी” किंवा “हलवा” नावाखाली मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा संताप व्यक्त होत आहे.
नियमांनुसार, अशा पदार्थांवर त्यातील घटकांची स्पष्ट माहिती देणे बंधनकारक असतानाही अनेक विक्रेते ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता अन्न व औषध प्रशासनाला तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले असून, हॉटेल, रेस्टॉरंट आणि मिठाई दुकानदारांना मेनूवर स्पष्ट माहिती देणे सक्तीचे करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करत, खरेदीपूर्वी लेबल तपासण्याचा सल्ला दिला आहे. संशयास्पद अन्नपदार्थ दिसल्यास त्वरित १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.










Total Users : 3290175