मलकापूर (हॅलो बुलडाणा) शिवणी ते तालसवाडा या ग्रामीण रस्त्याच्या कडेला ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमोल भाऊराव भवरे असे मृत तरुणाचे नाव असून, मृतदेहावरील गळ्याच्या ठळक खुणांमुळे हा अपघाती मृत्यू नसून थेट गळा आवळून खून करण्यात आल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.
८ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास रस्त्याच्या कडेला संशयास्पद अवस्थेत मृतदेह पडलेला असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच मलकापूर ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असून अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गळ्यावर आढळलेल्या खुणा, मृतदेहाची स्थिती आणि घटनास्थळावरील परिस्थिती पाहता हा प्रकार पूर्वनियोजित खुनाचा असल्याचा संशय अधिक बळावला आहे. तरुणाची हत्या करून मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही.सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि मृत तरुणाच्या मागील हालचालींच्या आधारे सखोल तपास सुरू आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच या रहस्यमय मृत्यूचा उलगडा होईल का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.











Total Users : 3292438