spot_img
spot_img

💥डॉक्टर निष्काळजी असतात काय? डॉ.राहुल चोपडेंनी एका मुलाला आणले कायमचे अपंगत्व! – आईने दिली पोलीस ठाण्यात तक्रार!

मलकापूर (हॅलो बुलडाणा) आधीच वडिलांचे अपघाती निधन झालेले..अशात घराची जबाबदारी असलेल्या मुलाचाही अपघात होऊन त्याला मलकापूर येथील चोपडे हॉस्पिटल येथे दाखल केले असता, डॉ. राहुल चोपडे यांनी चुकीच्या पद्धतीने हलगर्जीपणा करून उपचार केल्याने मुलाला कायमचे अपंगत्व आल्याची तक्रार मुलाच्या आईने पोलिसांना केली आहे.

फिर्यादी श्रीमती पुनम विश्वनाथ भारंबे रा.रोहित कॉलनी, ह.मु. आनंद सोसायटी, मलकापूर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, त्यांचे पती विश्वनाथ भारंबे यांचा ट्रकचे चाक बदलत असताना मृत्यू झाला. त्या टेलरिंग काम करून एका मुलाचा व एका मुलीचा सांभाळ करीत आहेत. 13 मार्च 2024 रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास त्यांच्या 20 वर्षीय दुर्गेश भारंबे याचा मुक्ताईनगर येथे कॉलेजसाठी मित्राच्या दूचाकीवर जात असताना दसरखेड येथे एमआयडीसी गेट समोर अपघात झाला.त्यामुळे दुर्गेशला मलकापूर येथील डॉ. राहुल चोपडे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. डॉ.राहुल चोपडे यांनी दूर्गेशचा डावा पाय फ्रॅक्चर व पोटरीवर रक्त गोठल्याचे सांगून, डाव्या पायाला प्लास्टर करून घरी पाठवून दिले.त्यानंतर दुर्गेशचा पाय आणखी दुखत होता.त्यामुळे दुर्गेशला पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.डॉ. चोपडे यांनी कंपाउंडरला सांगितल्याने दुर्गेश च्या पायाचे प्लास्टर सैल करण्यात आले. परंतु दुसऱ्या दिवसापर्यंत पाय दुखत असल्यामुळे पुन्हा हॉस्पिटलमध्ये दुर्गेशला घेऊन गेले असता, डॉक्टर गैरहजर असल्याने दुर्गेशला घरी परतावे लागले. त्यानंतर दुर्गेशला बऱ्हाणपूर येथील डॉ.सुबोध बोरले यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.तेथे वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या.दरम्यान दुर्गेशच्या पायाचे रक्त गोठून पाय निकामी झाला होता.वेळीच महत्त्वाचे उपचार करणे गरजेचे होते.मात्र विलंब झाल्याने शस्त्रक्रिया करून दुर्गेशचा पाय कापण्यात आला.त्यामुळे दुर्गेश आता डॉ.राहुल चोपडे यांच्या हलगर्जीपणामुळे कायमस्वरूपी अपंग झाला आहे. त्यांनी चुकीच्या पद्धतीने उपचार केला व कोणतीही काळजी घेतली नाही,असा आरोप करीत डॉ.राहुल चोपडे यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करून न्याय मिळावा, अशी मागणी श्रीमती पूनम भारंबे यांनी पोलीस तक्रारी केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!