बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘आ देखे जरा..किस मे कितना है दम..’असे म्हणत जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात 115 उमेदवार रणसंग्रामात उतरले आहेत. परंतु खरी तुल्यबळ लढत बुलढाणा व मेहकर विधानसभा मतदारसंघात रंगणार आहे. उद्धव ठाकरे जिल्हा दौरा करून गेले असल्याने उद्धव सेनेत कमालीचा जोश दिसून येत आहे तर शिंदे सेनापुढे हे कडवे आव्हान असणार आहे.
मेहकरात शिंदे सेनेचे प्रस्थापित उमेदवार डॉ. संजय रायमुलकर यांच्या विरुद्ध मतदारसंघात नाराजीचा सूर उमटत असून उद्धव सेनेचे उमेदवार सिद्धार्थ खरात रखडलेला विकासाचा अनुशेष भरण्यासाठी पायाला भिंगरी लावून प्रचाराचा धुराळा उडवत आहे. तर दुसरीकडे डॉ. रायमुलकर हे सिद्धार्थ खरात आयात उमेदवार असल्याचे सांगत असून आपलाच विजय निश्चित असल्याचे भासवत आहेत. दरम्यान बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनाचे उमेदवार संजय गायकवाड यांनी जोरदार प्रचाराचा धडाका सुरू केल्याने व त्यांनी केलेल्या विकासकामामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह दिसून येतोय. तर उद्धव सेनेच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी काल झालेल्या उद्धव ठाकरेंच्या महासभेत आमदार गायकवाड यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.अजूनही स्टार प्रचारकांच्या सभा होणे बाकी असून,शह कटशहाचे राजकारण दिवसागणिक तापणार असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघातील 115 उमेदवार निवडणूक रिंगणात भाग्य आजमावत असल्याने मतांचे ध्रुवीकरण होण्याची चिन्ह आहेत.










