देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) ई-पॉस मशीनमध्ये गत दोन महिन्यांपासून सर्व्हर डाऊनची समस्या उद्भवत आहे. त्यावर अजूनही तोडगा निघाला नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात रेशन लाभार्थ्यांना धान्य वितरण करताना अडचणी येत आहे. वितरण बंद असल्याने लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानांवर हेलपाटे मारावे लागत आहे. कोडमेलेली स्वस्त धान्य वितरण व्यवस्था शासनाने तत्काळ यावर तोडगा काढून स्वस्त धान्य वितरण सुरळीत करावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केल्या जाईल. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी तहसीलदारांना दिला आहे.
राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशन दुकानदारांना मिळालेल्या इ-पॉस मशीन मध्ये तांत्रिक अडचण निर्माण होत आहे. परिणामी धान्य वितरण प्रक्रिया ठप्प होऊन गरजू लाभार्थ्यांना धान्य मिळेनासे झाले आहे. या समस्येमुळे स्वस्त धान्य दुकानदारही हवालदिल झाले आहे. दुकानदारांना काही महिन्यापूर्वी 5 जी नेटवर्क असणाऱ्या ई -पॉस मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. यामुळे धान्य वितरण जलद गतीने होईल अशी अपेक्षा स्वस्त धान्य दुकानदार बाळगून होते. मात्र प्रतेक्षात तसे काहीच झाले नाही. याउलट वारंवार सर्व्हर ठप्प होऊन ई -पॉस मशीन बंद राहत आहे. त्यामुळे रेशन धारकांना धान्य वितरण करणे अशक्य होत आहे. मागील महिन्यात ही समस्या अधिक तीव्र झाली असून गरजू लाभार्थ्यांना धान्य मिळण्यास विलंब झाला. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर काम बुडवून दुकानांसमोर रांगेत उभे राहून धान्य घेत असतात. परंतु तासंतास उभे राहूनही ई -पॉस मशीन सर्व्हर डाऊन मुळे लाभार्थ्यांना धान्य मिळत नाही. गरिबांच्या धान्याची काळजी कोणाला असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे ई -पॉस मशीन मधील तांत्रिक अडचण दूर करून धान्य वितरण प्रणाली सुरळीत करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे, निवेदनावर तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, शहराध्यक्ष विजय खांडेभराड, रवींद्र इंगळे,जना मगर, अजबराव मुंडे, निलेश शिंदे, इमरान कुरेशी, सचिन कोल्हे, ऋषी शिंगणे, सतीश म्हस्के आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.