सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) सायकल चालवा, आरोग्य जपा आणि इंधन वाचवा! हा संदेश घेऊन रविवारी सकाळी दुसरबीडच्या रस्त्यावर विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स, पोलीस कर्मचारी आणि नागरिक सायकलींसह उतरले. निमित्त होतं किनगाव राजा पोलीस ठाण्याने २९ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या ‘संडे ऑन सायकल’ मॅरेथॉनचं. शालेय विद्यार्थ्यांसह युवक, पत्रकार आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संजय मातोंडकर यांनी या मॅरेथॉनचे आयोजन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘फिट इंडिया’ अभियानाच्या अनुषंगाने हा उपक्रम घेण्यात आला. ‘खेलो इंडिया’ आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.
जवळच्या अंतरासाठी सायकल वापरली, तर रोजच्या प्रवासातच व्यायाम होतो. अशा प्रवासासाठी मोटार वाहनांचा वापर कमी झाला, तर इंधनाची बचत होते आणि वायुप्रदूषण कमी करण्यासही हातभार लागतो. त्यामुळे रविवारच्या या मॅरेथॉनमधून पोलिसांनी नागरिकांना रोजच्या प्रवासातही सायकलीला जागा देण्याचं आवाहन केलं. आरोग्याची काळजी आणि पर्यावरणाचं रक्षण, या दोन्ही गोष्टी आपल्या रोजच्या सवयींतून साधता येतात, हा संदेश या फेरीतून देण्यात आला.
यावेळी ठाणेदार संजय मातोंडकर, प्रदेश सरचिटणीस इरफानअली शेख, प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, शिवसेना नेते गजेंद्र देशमुख, ज्येष्ठ पत्रकार बाजीराव वाघ, लोकजागरचे विश्वस्त प्रवीण गिते, याकूब शेख, सागर सांगळे, रणधीर गायकवाड आणि जीशान अली शेख उपस्थित होते. विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.






Total Users : 3840164