मलकापूर (हॅलो बुलढाणा/करन झनके) दुपारचे सव्वादोन वाजले होते. भातृमंडळ रोडवरील आयसीआयसीआय बँकेजवळ नेक्सॉन उभी करून राजपूत दाम्पत्य तुलसी ज्वेलर्समध्ये गेले. दागिने घेऊन परतले, तेव्हा गाडीच्या मागच्या दरवाजाची काच फुटलेली होती आणि आत ठेवलेली निळी बॅग गायब होती. अज्ञात चोरट्यांनी बॅगेसह सुमारे चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले.
मुक्ताईनगरच्या शांतिनगर येथील विकास गुलाबसिंह राजपूत यांच्या आई इंदरकौर राजपूत यांच्यावर मलकापुरातील आयुष्यमान रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आईच्या तब्येतीची विचारपूस करून राजपूत दाम्पत्य हरणखेड येथे बारशाच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी निघाले होते. बारशासाठी दागिने खरेदी करण्याकरिता ते तुलसी ज्वेलर्समध्ये थांबले. ते दुकानात असतानाच चोरट्यांनी गाडीची काच फोडून डल्ला मारला.
लंपास झालेल्या निळ्या बॅगेत ११ ग्रॅमची सोन्याची शॉर्ट पोत, ६ ग्रॅमची कर्णफुले आणि एकूण १० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या होत्या. या २७ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची अंदाजित किंमत चार लाख रुपये आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक शुभम बरदाडे, अख्तार शेख आणि पोलीस कर्मचारी संतोष पेंडारकर व संतोष कुमावत घटनास्थळी दाखल झाले. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, घटनास्थळी न्यायवैद्यक पथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. भरदुपारी बँकेजवळ उभ्या गाडीतून लाखोंचा ऐवज लंपास झाल्याने शहरात खळबळ उडाली. वृत्त लिहीपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.






Total Users : 3838904