बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाण्याच्या राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भारतीय बनावटीच्या रोबोटच्या साहाय्याने पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. शिवशंकर इंगळे यांच्या हर्नियावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. आता या तंत्रज्ञानाचा लाभ गोरगरीब रुग्णांनाही मिळावा, यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत रोबोटिक शस्त्रक्रियेचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.
जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एस. एस. मंत्रा रोबोटिक्सने सुमारे १६ कोटी रुपये किमतीचा स्वदेशी सर्जिकल रोबोट महाविद्यालयाला भेट दिला. रोबोटिक सर्जन डॉ. सुधीर श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत पहिली शस्त्रक्रिया पार पडली. राज्यातील शल्यचिकित्सकांनी ही प्रक्रिया प्रत्यक्ष पाहिली. बुलढाण्यात रोबोटिक शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण केंद्रही सुरू करावे, अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली.
‘सुश्रुत’ रोबोटसाठी कंपनीची तयारी
आयुष उपचारांसाठीही स्वदेशी रोबोट विकसित करण्याची सूचना जाधव यांनी कंपनीकडे केली. त्याला प्रतिसाद देत ‘सुश्रुत’ नावाचा रोबोट विकसित करण्याची तयारी कंपनीने दर्शवली. याच कार्यक्रमात एनएबीएल कार्यशाळेचेही उद्घाटन झाले.
पहिल्याच दिवशी ६० बालकांची इको तपासणी
सेवा सप्ताहानिमित्त २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी महाविद्यालयात जन्मजात हृदयविकारांच्या निदानासाठी मोफत टू-डी इको शिबिर आयोजित करण्यात आले. ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी २८ नोव्हेंबरला ६० बालकांची तपासणी केली. त्यापैकी ४७ बालकांवर मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. त्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचे पथक समन्वय साधत आहे.






Total Users : 3838041