रायपूर (हॅलो बुलढाणा) रायपूर–हातनी–सैलानी–दुधा राष्ट्रीय महामार्गावरील अर्धवट कामाचा प्रश्न घाटनांद्राजवळील भीषण अपघातानंतर पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुभाजकाला धडकून कार उलटल्याने ढालसावंगी येथील गोपी विजय हिवाळे (वय २२) याचा मृत्यू झाला. शनिवारी, २८ नोव्हेंबर रोजी दुपारी दुधा येथील रवी सोनुने यांच्या गोठ्यासमोर ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोपी कारने सैलानीहून घाटनांद्राकडे जात होता. वाटेत अर्धवट दुभाजकाचा अंदाज न आल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर जोरात आदळली. धडकेनंतर कार सुमारे २० फूट उंच उडाल्याचे सांगितले जात आहे. रस्त्यालगतच्या तुरीच्या शेतात कोसळलेल्या कारने चार पलट्या घेतल्या.
अपघाताच्या वेळी गोपी कारमध्ये एकटाच होता. गंभीर जखमी झालेल्या गोपीच्या मदतीला स्थानिकांनी तातडीने धाव घेतली. त्याला उपचारासाठी बुलढाण्यातील रुग्णालयाकडे नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्याआधीच वाटेत त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अकाली मृत्यूने ढालसावंगी गावावर शोककळा पसरली आहे.
या महामार्गाचे काम अनेक ठिकाणी रखडले आहे. अशा ठिकाणी वाहतूक सुरू असताना चालकांना अर्धवट दुभाजक दिसावेत म्हणून कोणती खबरदारी घेतली होती? धोकादायक ठिकाणी सूचना फलक आणि परावर्तक लावले होते का? या मार्गावर वारंवार अपघात होत असताना संबंधित यंत्रणेने कोणती उपाययोजना केली? गोपीच्या मृत्यूनंतर तरी प्रशासन उर्वरित काम पूर्ण करण्याची तारीख जाहीर करणार का?






Total Users : 3838650