spot_img
spot_img

CRIME UPDATE! घरासमोर ‘डुग्गु’ची किंकाळी… पाळीव कुत्र्याचा ‘मर्डर’? ‘विळा का मारला?’ विचारताच महिलेला म्हणाला, ‘तुला पण कुत्र्यासारखे कापून टाकीन!’हिवरखेड पोलिसांत गुन्हा दाखल!

खामगाव (हॅलो बुलढाणा) सायंकाळी घरासमोरून ‘डुग्गु’चा ओरडण्याचा आवाज येताच निकीता वानखडे बाहेर आल्या. त्यांच्या पाळीव कुत्र्याच्या पाठीवर गंभीर जखम होती. त्यांनी गावातील अजय आत्माराम खरातला याबाबत जाब विचारला. त्यावर मध्ये पडल्यास ‘तुला पण कुत्र्यासारखे कापून टाकीन’ अशी धमकी खरातने दिल्याचा आरोप निकीता यांचे पती विशाल वानखडे यांनी फिर्यादीत केला आहे.  जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या आंबेटाकळी येथे ही घटना घडली.

आंबेटाकळीत कुटुंबासह राहणारे विशाल किसन वानखडे (३२) शेती करतात. त्यांच्या फिर्यादीनुसार, घरच्याच कुत्रीपासून जन्मलेल्या भुरकट रंगाच्या पाळीव कुत्र्याचं नाव त्यांनी ‘डुग्गु’ ठेवलं होतं. तो अंदाजे सहा वर्षांचा होता. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ‘डुग्गु’ घरासमोर होता. त्याच वेळी खरात तेथे आला. त्याने हातातील धारदार विळ्याने ‘डुग्गु’च्या पाठीवर वार करून त्याला गंभीर जखमी केल्याचे विशाल यांनी पोलिसांना सांगितले.

निकीतांना धमकी दिली गेली, त्या वेळी बाबुराव शेगोकार आणि मारोती अंबीलकार तिथे उपस्थित होते, असाही फिर्यादीत उल्लेख आहे. त्यानंतर खरात तिथून निघून गेला. विशाल घरी परतल्यावर निकीतांनी त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्याच संध्याकाळी वानखडे कुटुंबाने ‘डुग्गु’वर उपचार केले. मात्र, घटनेनंतर साधारण साडेदहा तासांनी, २८ नोव्हेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

‘डुग्गु’च्या मृत्यूनंतर विशाल यांनी मोठे भाऊ नागसेन किसन वानखडे यांच्यासह हिवरखेड पोलीस ठाणे गाठून तोंडी फिर्याद दिली. कुत्र्याच्या मृत्यूस खरात जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांनी त्याच्यावर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३२५ आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला. पोलीस हवालदार रामेश्वर राठोड यांच्याकडे तपास सोपवण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!