चिखली (हॅलो बुलढाणा/सैय्यद साहिल) ज्या तहसीलदारांनी १३ नोव्हेंबरला भोगवटा प्रमाणपत्र दिलं, त्यांच्याच कार्यालयातून २८ नोव्हेंबरला ते रद्द करण्याचं पत्र निघालं! अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक इमारतींच्या बांधकामांशी संबंधित या निर्णयावरून संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे आक्रमक झाले आहेत. सत्ताधाऱ्यांच्या दबावातून प्रशासनाने आकसाने ही कारवाई केल्याचा आरोप त्यांनी चिखलीतील पत्रकार परिषदेत केला.
सावारगाव डुकरे येथील गट क्रमांक ११७ आणि ११८ मधील बांधकामे नियमित करण्यासाठी परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेने २०२२ मध्ये अर्ज केला होता. नगररचना विभागाने आकारलेल्या कोट्यवधी रुपयांच्या दंडाला संस्थेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. १० मार्च २०२६ रोजी न्यायालयाने तो दंड रद्द केला. त्यानंतर संस्थेने आवश्यक कागदपत्रे सादर केली आणि नियमानुसार चलनही भरले, असे बोंद्रे यांनी सांगितले.
चार आठवड्यांत पूर्ण होणे अपेक्षित असलेल्या प्रक्रियेला तहसील कार्यालयाने आठ महिने लावले, असा बोंद्रेंचा आरोप आहे. अखेर मिळालेले प्रमाणपत्र ऑनलाइन प्रक्रिया अपूर्ण असल्याच्या कारणावरून पंधरा दिवसांत रद्द करण्यात आले. प्रशासनाने संस्थेला बीपीएमएस प्रणालीवर नव्याने ऑनलाइन अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
भोगवटा प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज बंधनकारक करणारा नियमच नसल्याचा दावा बोंद्रे यांनी केला. ऑनलाइन प्रक्रियेची अट होती, तर प्रमाणपत्र देतानाच ती का तपासली नाही, असा सवाल आता या निर्णयामुळे उभा राहिला आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या कारवाईविरोधात संस्थेच्या न्यायासाठी लढा देणार असल्याचे बोंद्रे यांनी स्पष्ट केले.






Total Users : 3836681