spot_img
spot_img

मुलींच्या हाती पाटी, जातीभेदाच्या भिंतीला तडा… महात्मा फुलेंना जळगाव जामोदचा सलाम!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) मुलींना शिक्षणाचा हक्क नाकारणाऱ्या व्यवस्थेला आव्हान दिलं, जातीभेदाविरुद्ध संघर्ष उभा केला आणि वंचितांना शिक्षणातून प्रगतीची वाट दाखवली. त्या क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना जळगाव जामोदकरांनी २८ नोव्हेंबर रोजी अभिवादन केलं. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

अंधश्रद्धा, जातीय विषमता आणि अन्यायाविरुद्ध महात्मा फुले यांनी आयुष्यभर लढा दिला. सावित्रीबाई फुले यांच्या साथीने त्यांनी मुलींसाठी शिक्षणाची दारं खुली केली. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेतून समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा विचार समाजात रुजवला. शिक्षणाचा हक्क आणि माणसाच्या समानतेचा आग्रह रोजच्या व्यवहारात उतरवणं, हीच फुले यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त झाली. पुण्यतिथीनिमित्त महात्मा फुले युवा मंचाने सायंकाळी शहरातून मिरवणुकीचे आयोजनही केले होते.

अभिवादन कार्यक्रमाला आमदार डॉ. संजय कुटे, माजी आमदार कृष्णराव इंगळे, बाजार समितीचे सभापती प्रसेनजीत पाटील, प्रा. भाऊसाहेब इंगळे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गजानन वाघ, भाजप जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, राष्ट्रवादीचे नेते रंगराव देशमुख, प्रवीण भोपळे, अविनाश उमरकर, नगराध्यक्ष गणेश दांडगे, लताताई तायडे यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!