मोताळा (हॅलो बुलढाणा) पाऊस नाही, पाणी नाही, तरीही शेतकऱ्याने रात्रंदिवस राबून पीक घरात आणलं. पण एका नराधमाला ते पाहवलं नाही. रात्रीच्या अंधारात येऊन त्याने शेतकऱ्याच्या वर्षभराच्या कष्टाला आग लावली. पुन्हई हनवतखेड शिवारात ही संतापजनक घटना घडली.
पुन्हई येथील शेतकरी उज्वल दिगंबर भंगाळे यांनी शेतात कापसाची गंजी लावून ठेवली होती. सोबतच शेतीसाठी लागणारं साहित्यही होतं. २२ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने कापूस ठेवलेल्या खोलीला आग लावून दिली.
सकाळी शेतात गेल्यावर भंगाळे यांना सगळा कापूस आणि शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाल्याचं दिसलं. वर्षभराची मेहनत राख झाली होती. या घटनेत जवळपास ७ लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
हा अपघात नाही, हा घातपात आहे. हा वीज पडून लागलेला वणवा नाही. हा शॉर्ट सर्किट नाही. हा जाणीवपूर्वक लावलेली आग आहे.दुष्काळात आधीच शेतकरी होरपळलेला आहे. पावसाने दगा दिला, तरी त्याने हार मानली नाही. कसेबसे पीक काढलं. हातातोंडाशी आलेला घास होता. तोच घास या नराधमाने हिसकावून घेतला.कापसाला आग लावण्यामागे नक्की कोण आहे? शेजारचा वाद आहे? पूर्ववैमनस्य आहे? की केवळ विकृती? पोलीसांनी फक्त पंचनामा करून थांबू नये. ही साधी आग नाही, हा शेतकऱ्याच्या जीवावर उठलेला हल्ला आहे.दोषीचा तातडीने शोध घ्या, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करा आणि झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शासनाकडून तातडीने आर्थिक मदत द्या, अशी मागणी शेतकरी उज्वल दिगंबर भंगाळे यांनी केली आहे. ही मागणी फक्त उज्वल भंगाळेंची नाही, ही संपूर्ण मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे.
जर या प्रकरणात आरोपी सापडला नाही, तर शेतकरी शांत बसणार नाही. आज उज्वल भंगाळेंची गंजी जळाली, उद्या दुसऱ्या शेतकऱ्याची जळेल. आजच या नराधमाला पकडलं नाही, तर उद्या गावात कुणाचंच पीक सुरक्षित राहणार नाही. पोलीसांनी तातडीने गुन्हा दाखल करून, तपासाची चक्रं वेगाने फिरवावीत. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे,अशी शेतकऱ्यांची भावना आहे.













Total Users : 3815362