spot_img
spot_img

साडेतीन एकरात दीड लाख गाडले; घरात तेलालाही पैसे नाहीत! ईसोलीत शेतकरी महिलांच्या व्यथा ऐकून तुपकरांचे डोळे पाणावले!

ईसोली (हॅलो बुलढाणा) शेतात घाम गाळला, पेरणीसाठी कर्ज काढलं, पण सोयाबीनला दाणेच भरले नाहीत! साडेतीन एकरात जवळपास दीड लाखांचा खर्च करूनही पदरात काहीच पडलं नाही. घरात साधं तेल आणायलाही पैसे उरले नाहीत… दुष्काळ संघर्ष यात्रेच्या सातव्या दिवशी ईसोलीतील शेतकरी महिलांनी मांडलेल्या या व्यथांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचेही डोळे पाणावले.

यात्रेदरम्यान तुपकरांनी आशाबाई मदन लागे आणि कांताबाई शेजूळ यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला. यावेळी महिलांनी दुष्काळामुळे उद्ध्वस्त झालेल्या संसाराची वेदना मांडली.

आशाबाईंनी साडेतीन एकरात सोयाबीन पेरले होते. मात्र, दाणे न भरताच पीक वाळले. सोंगणीसाठी मजुरी देण्याइतकेही पैसे नसल्याने त्यांनी सोंगणीच केली नाही. शेतीत झालेला खर्च वाया गेला; वर व्याजाने घेतलेले पैसे आणि इतर देण्यांचा बोजा कायम राहिला.

“घरात तेल घ्यायलाही पैसे नव्हते, म्हणून बिना तेलाची भाजी बनवली. डोक्याला लावायला तेल नव्हतं, म्हणून पाणी लावलं!”एका महिलेने सांगितलेली ही आपबिती उपस्थितांना सुन्न करून गेली.

या परिस्थितीने हेलावलेल्या तुपकर आणि कार्यकर्त्यांनी तिथेच आपापसात वर्गणी गोळा केली. आशाबाई आणि कांताबाई यांना घरातील किराणा भरण्यासाठी आर्थिक मदत देण्यात आली. मदतीची रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही.

“ही मदत मोठी नाही; त्यांच्या कठीण काळात माणुसकीची साथ देण्याचा छोटासा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या घरातील चूल पेटावी आणि त्यांच्या कष्टांना न्याय मिळावा, यासाठी संघर्ष आणखी ताकदीने लढायचा आहे,” असा निर्धार तुपकरांनी व्यक्त केला.

एका बाजूला वाळलेलं पीक, दुसरीकडे देण्यांचा डोंगर आणि घरात किराण्यासाठीही पैसे नाहीत ईसोलीतील या भेटीतून शेतकरी कुटुंबांच्या जगण्याचा विदारक प्रश्न समोर आला. पेरणीसाठी दीड लाख खर्च करणाऱ्या शेतकरी महिलेच्या घरात तेलही नसावं, यापेक्षा भयाण वास्तव कोणतं? या महिलांच्या व्यथा मदतीपलीकडे जाऊन शेतीच्या खर्चाचा, उत्पन्नाचा आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा हिशेब मागत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!