spot_img
spot_img

BIG EXCLUSIVE! आमदार संचेती साहेब, तुमच्याच शहरात न्यायासाठी दुकाने बंद करावी लागावीत? अॅसिड हल्ल्याला महिना उलटला, आरोपी अटकेबाहेर; मलकापूरचा मूक मोर्चा विचारतोय आता तरी आवाज उठवणार का?

मलकापूर (हॅलो बुलढाणा) दुकाने बंद होती… घोषणा नव्हत्या… पण हातातील निषेधाचे फलक आणि रस्त्यावर उतरलेले हजारो व्यापारी एकच प्रश्न विचारत होते आम्हाला न्याय कधी मिळणार? व्यापारी राजेश तलरेजा यांच्यावरील अॅसिड हल्ल्याला महिना उलटूनही आरोपीला अटक झालेली नसल्याच्या निषेधार्थ आज मलकापूरकरांनी कडकडीत बंद पाळला. भव्य मूक मोर्चातून व्यक्त झालेल्या संतापाने व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा शहराच्या वेशीबाहेर पोहोचवला आहे.

भाजपा आमदार चैनसुख संचेती यांचे होमटाऊन असलेल्या मलकापुरात एका व्यापाऱ्यावर अॅसिड हल्ला होतो. महिनाभरानंतरही आरोपी अटकेबाहेर असल्याने व्यापाऱ्यांना व्यवसाय बंद ठेवून न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागते. ही परिस्थिती लोकप्रतिनिधींसाठीही गंभीर आत्मपरीक्षणाची वेळ नाही काय? आमदार संचेती यांनी या प्रकरणात पुढाकार घेऊन पीडिताला न्याय मिळवून देण्यासाठी ठोस पाठपुरावा करावा, ही अपेक्षा रास्त नाही का?

मोर्चात सहभागी व्यापाऱ्यांनी कोणत्याही घोषणा दिल्या नाहीत. मात्र, त्यांच्या मौनातून उमटलेला प्रश्न बोचरा होता. व्यापार करायचा की सुरक्षिततेची चिंता करायची? गंभीर हल्ल्यानंतरही न्यायासाठी सामूहिकपणे रस्त्यावर उतरावे लागत असेल, तर सामान्य नागरिकांचा विश्वास टिकणार कसा?

हा बंद केवळ बाजारपेठेतील व्यवहार थांबवणारा नव्हता; शहरातील अस्वस्थता समोर आणणारा होता. तलरेजा यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत व्यापाऱ्यांनी आपल्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आणला. आरोपीला तातडीने अटक व्हावी आणि पीडित व्यापाऱ्याला न्याय मिळावा, यासाठी मलकापूरकर एकवटले.

एका व्यापाऱ्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ हजारो व्यापारी एकत्र येतात, तेव्हा त्या आंदोलनाची दखल केवळ गर्दी म्हणून घेता येत नाही. त्यांच्या हातातील फलकांमागे सुरक्षितपणे व्यवसाय करण्याची आणि न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. या अपेक्षेला ठोस प्रतिसाद कधी मिळणार, याचे उत्तर आता मलकापूरला हवे आहे.

आमदारांच्या स्वतःच्या शहरात घडलेल्या या घटनेचा पाठपुरावा कुठवर पोहोचला? व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी लोकप्रतिनिधी कोणती ठोस पावले उचलणार? आजचा मूक मोर्चा हे प्रश्न मागे ठेवून गेला आहे

 

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!