बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील सुमारे ३४,५०० न्यायालयीन कर्मचारी आज, १७ नोव्हेंबर पासून बेमुदत संपावर गेले आहेत. जिल्हा व तालुका न्यायालयांतील कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. दरम्यान संपाला बुलढाणा जिल्हा वकील संघाचा पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच दुय्यम न्यायालयांतील कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, ही प्रमुख मागणी आहे. याबाबतचा प्रस्ताव मुंबई उच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२५ रोजी शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे पाठविला आहे. मात्र, अद्याप निर्णय झाला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
या संपात लिपिक, लघुलेखक, बेलीफ, वाहनचालक, शिपाई, सफाई कर्मचारी आदी संवर्गातील कर्मचारी सहभागी आहेत. यापूर्वी काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले होते. निर्णय न झाल्याने बेमुदत संप पुकारण्यात आला.दरम्यान, बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हा वकील संघाने जाहीर पाठिंबा दिला. संघाचे अध्यक्ष ॲड. विजय सावळे यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. “न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आम्ही आपल्या सोबत आहोत,” अशी भूमिका ॲड. सावळे यांनी व्यक्त केली. यावेळी वकील संघाचे पदाधिकारी, विधीज्ञ आणि मोठ्या संख्येने न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.













Total Users : 3776747