नांदुरा (हॅलो बुलढाणा) “आमच्याकडून १० टक्के कमिशन घ्या… पण आमच्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत मिळवून द्या. त्यासाठी हेक्टरची मर्यादाही घालू नका,” अशा शब्दांत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सत्ताधाऱ्यांना खोचक टोला लगावला. दुष्काळ संघर्ष यात्रेच्या दुसऱ्या दिवशी, १५ नोव्हेंबरच्या रात्री नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या मदतीत कमिशन मिळत नसल्याने सत्ताधारी नेते त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत नाहीत, असा आरोप तुपकरांनी केला.
सकाळी माकनेर, रात्री निमगावात शेतकऱ्यांची गर्दी!
१४ नोव्हेंबरला मलकापूर येथून निघालेल्या यात्रेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सकाळी नऊ वाजता माकनेरमधून झाली. काटी, विटाळी, सिरसोडी, चांदूरबिस्वा, दिघी, वडनेर आणि अलमपूरमार्गे यात्रा रात्री निमगावात पोहोचली. गावोगावी शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन नागरिक आणि महिलांनी यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत केले. दुष्काळामुळे झालेली आर्थिक कोंडी, कोसळलेले शेतमालाचे भाव, पीक नुकसान आणि वाढता कर्जबोजा या अडचणी शेतकऱ्यांनी तुपकरांसमोर मांडल्या. रात्री उशिरा झालेल्या निमगावच्या सभेलाही शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘पाच हजारांची मदत नको, हक्काची नुकसानभरपाई द्या!’
दुष्काळाने झालेल्या नुकसानीपुढे पाच हजारांची मदत अपुरी असल्याचे सांगत तुपकरांनी क्षेत्रमर्यादेशिवाय हेक्टरी एक लाख रुपयांची मागणी लावून धरली. संपूर्ण कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना दोन लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान, कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव, पीकविम्याची पूर्ण नुकसानभरपाई आणि मायक्रोफायनान्स कंपन्यांची सक्तीची कर्जवसुली थांबवण्याची मागणीही त्यांनी केली. मेंढपाळांच्या आंतरजिल्हा चराईवरील निर्बंध हटवावेत आणि दुष्काळग्रस्त पशुपालकांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी मांडली.
आता ४ डिसेंबरला बुलढाण्यात ‘एल्गार’!
जिल्ह्यातील तेराही तालुक्यांतून मार्गक्रमण करणाऱ्या यात्रेत गावोगावी शेतकऱ्यांशी संवाद आणि कॉर्नर सभा सुरू आहेत. या भेटींमधून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जात आहे. ४ डिसेंबरला बुलढाण्यात होणाऱ्या एल्गार महामोर्चासाठी जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी एकत्र यावे, असे आवाहन तुपकरांनी निमगावच्या सभेत केले













Total Users : 3773485