मेहकर (हॅलो बुलढाणा) पावसाळ्यात शेतात जाण्याची कसरत आणि काढलेला शेतीमाल बाहेर आणण्याची अडचण कमी करण्यासाठी मेहकर तालुक्यातील बोरी आणि अंत्री देशमुख येथे पाणंद रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद योजनेंतर्गत एकूण २३ लाख ५३ हजार रुपयांच्या या दोन कामांचे भूमिपूजन आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते झाले.
बोरी येथे गट क्रमांक ८९ मध्ये नारायण कायंदे यांच्या शेतापासून विष्णू कायंदे यांच्या शेतापर्यंत एक हजार मीटरचा पाणंद रस्ता तयार केला जाणार आहे. या कामाचा अंदाजित खर्च १२ लाख ५८ हजार रुपये आहे. अंत्री देशमुख येथे गट क्रमांक ४०३ ते ४३९ दरम्यानच्या पाणंद रस्त्यासाठी १० लाख ९५ हजार रुपये मंजूर झाले आहेत.
या रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यावर ट्रॅक्टर आणि इतर वाहने शेतापर्यंत नेणे सोपे होईल. पावसाळ्यातील ये-जा सुलभ होण्यासोबतच शेतीमालाच्या वाहतुकीत शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम वाचण्यास मदत होईल. पाणंद रस्ता समितीचे अध्यक्ष असलेल्या आमदार खरात यांच्या पुढाकारातून ही कामे हाती घेण्यात आली आहेत.
भूमिपूजनाला समितीचे सहअध्यक्ष शिवशंकर गायकवाड, राजगुरू सर, गजानन निकस, अमोल बोरे, गणेश गावंडे, नंदकिशोर देशमुख, कडूबा शेजुळ, गटविकास अधिकारी दिनकर खरात, नायब तहसीलदार दीपक देशमुख आणि सहायक गटविकास अधिकारी संदीप मेटांगळे उपस्थित होते. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि ग्रामस्थही उपस्थित होते.













Total Users : 3773494