spot_img
spot_img

हॅलो बुलढाणा | CRIME STORY UPDATE! फोन कोमलचा, खबर हत्येची, दोघांना बेड्या… अशी होती चिखलीतील टाकरखेडा मुसलमानच्या गोपाल पवारांची मर्डर स्टोरी!

चिखली (हॅलो बुलढाणा/सय्यद साहिल) १६ नोव्हेंबर २०२६ दुपारी बाराच्या सुमारास गोपाल पवार आणि कोमल भोसले दुचाकीवरून पांढरदेवकडे निघाले. दीडच्या सुमारास गोपालच्या चुलत भावाला कोमलचा फोन आला. गोपाल महिमळकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडला आहे, असे तिने सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. नातेवाइकांनी घटनास्थळ गाठले तेव्हा गोपाल निपचित पडले होते. चिखली तालुक्यातील कव्हळा-महिमळ कच्च्या रस्त्यावर १५ नोव्हेंबरला घडलेल्या या हत्या प्रकरणात आमडापूर पोलिसांनी कोमल भोसले आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती अजय ऊर्फ गोट्या विजय पवार यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यात सर्वप्रथम ‘हॅलो बुलढाणा’ने या हत्येचे वृत्त दिले होते. पहिल्या वृत्तात डीवायएसपी यामावर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती दिली होती. आता तक्रारीतील घटनाक्रम आणि दोघांच्या अटकेचा पहिला सविस्तर अपडेटही ‘हॅलो बुलढाणा’ देत आहे.

पांढरदेवकडे जाताना वाटेत अजयला बोलावल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, कोमल आणि अजय यांच्यात पूर्वी फारकत झाली होती. त्यानंतर कोमल सुमारे वर्षभर गोपाल यांच्यासोबत राहत होती. या काळात कोमल आणि अजय पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांचे संबंध पुन्हा जुळल्यानंतर दोघांनी गोपाल यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.

१५ नोव्हेंबरला गोपाल यांच्यासोबत पांढरदेवकडे जाताना कोमलने अजयला वाटेत बोलावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कव्हळा ते महिमळदरम्यानच्या कच्च्या रस्त्यावर दोघांनी मिळून गोपाल यांच्यावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गोपाल यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे.

फोनवर हल्ल्याची माहिती, नातेवाईक धावले घटनास्थळी

गोपाल यांचे चुलत भाऊ मनोज आसाराम पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दुपारी दीडच्या सुमारास कोमलने त्यांना फोन केला. आपण आणि अजयने मिळून गोपाल यांच्यावर हल्ला केला, असे तिने फोनवर सांगितल्याचे मनोज यांनी तक्रारीत म्हटले आहे. गोपाल कुठे पडले आहेत, हेही तिने सांगितल्याचा त्यांचा दावा आहे. फोन मिळताच मनोज आणि करण आसाराम पवार तातडीने त्या रस्त्यावर पोहोचले. तिथे गोपाल यांच्या शरीरावर गंभीर जखमा दिसल्या.

दुपारी तक्रार, सायंकाळी दोघांना अटक

मनोज पवार यांनी आमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी घटनेनंतर पसार झालेल्या दोन्ही संशयितांचा शोध सुरू केला. त्याच दिवशी सायंकाळी कोमल आणि अजय यांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. अजयला वाटेत कधी बोलावण्यात आले, हल्ल्याचे नियोजन आधीपासून होते का आणि त्यामागचे नेमके कारण काय, याचा तपास आमडापूर पोलीस करत आहेत

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!