मलकापूर (हॅलो बुलढाणा) शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी रविकांत तुपकर रस्त्यावर उतरले. त्याच दुष्काळ संघर्ष यात्रेत दहावीत शिकणाऱ्या त्यांच्या लेकीने माईक हातात घेतला आणि थेट सवाल केला, “इतक्या लांबून लोक तुमच्यासाठी लढायला येतायत. तुम्ही घरात बसलात, तर या लढ्याला काय अर्थ राहणार?” यज्ञजा रविकांत तुपकर हिच्या या भाषणाने उपस्थितांचे लक्ष वेधले. लेकीचे भाषण सोशल मीडियावर शेअर करताना तुपकरांनी लिहिले, “मन अभिमानाने भरून आलंय.”
आपण आणि आपला भाऊ सकाळपासून यात्रेत सहभागी असल्याचे यज्ञजाने सांगितले. कर्नाटकातून आलेले प्रेम चौगुले तसेच गजभाऊ कावरखे, नामदेव पतंगे यांचा उल्लेख करत तिने शेतकऱ्यांना स्वतःच्या हक्कांसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. “ही तुमची लढाई आहे. तुम्हालाच या लढाईत सहभागी व्हावं लागेल,”असे ती म्हणाली.
‘संकटाची कल्पना होती, मग मदतीचं नियोजन कुठं?’
एल निनोच्या पार्श्वभूमीवर दुष्काळसदृश संकटाची पूर्वकल्पना असताना सरकारने शेतकऱ्यांसाठी आधीच उपाययोजना का केल्या नाहीत, असा सवाल यज्ञजाने केला. नुकसानभरपाईचे नियोजन कुठे होते आणि संकटाला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांना कोणता आधार दिला, असे प्रश्नही तिने उपस्थित केले. सोशल मीडियावर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून त्यांचा आवाज अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन तिने तरुणांना केले. “आपण त्यांच्यासमोर झुकायचं नाही, त्यांना आपल्यासमोर झुकवायचं आहे,” असेही ती म्हणाली.
लेकीचे शब्द ऐकून तुपकर भावूक
शेतकऱ्यांचे कष्ट, वेदना आणि संघर्ष यांची लेकीला असलेली जाणीव तिच्या शब्दांतून दिसली, अशी भावना तुपकरांनी व्यक्त केली. “या शेतकरी लढ्याला लेकीची मिळालेली ही खंबीर साथ निश्चितच नवी ऊर्जा आणि बळ देणारी आहे,”असे त्यांनी लिहिले.
१४ नोव्हेंबरला मलकापूर येथून सुरू झालेली दुष्काळ संघर्ष यात्रा जिल्ह्यातील तेराही तालुक्यांतून जाणार आहे. ४ डिसेंबरला बुलढाण्यात महाएल्गार मोर्चाने यात्रेचा समारोप होणार असून, या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यज्ञजाने केले.













Total Users : 3770027