spot_img
spot_img

धरणात पाणी, कालव्याला अडथळे… आता पेनटाकळीचा फैसला ३० तारखेला! मुदतीत पाणी सुटलं नाही, तर शेतकऱ्यांसह येऊन स्वतः पाणी सोडणार! आमदार सिद्धार्थ खरातांचा थेट इशारा

मेहकर (हॅलो बुलढाणा) पेनटाकळी धरणातून ३० तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याचा मार्ग मोकळा होणार का? कालव्याच्या पाहणीत ठिकठिकाणी अपूर्ण कामे समोर आल्यानंतर आमदार सिद्धार्थ खरात यांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या. ३० तारखेपर्यंत पाणी सोडले नाही, तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन आपण स्वतः घटनास्थळी जाऊन पाणी सोडू, असा इशाराही त्यांनी दिला.

धरणापासून शून्य ते ११ किलोमीटरदरम्यान कालव्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम रखडले आहे. त्यामुळे १८ किलोमीटरच्या मुख्य कालव्यासह त्यापुढील सहा किलोमीटरच्या कालव्यातून पाणी सोडण्यात अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर खरात यांनी पदाधिकारी, गावकरी आणि शेतकऱ्यांसह प्रत्यक्ष कालव्यावर जाऊन कामाची पाहणी केली.

दहा ठिकाणी २०० ते ३०० मीटरचे पट्टे अपूर्ण!

कालव्याच्या मार्गावर सुमारे दहा ठिकाणी प्रत्येकी २०० ते ३०० मीटर लांबीचे पट्टे अपूर्ण असल्याचे पाहणीत आढळले. काही ठिकाणी पाणी गळती होत असल्याचेही दिसून आले. त्यात मोठ्या पुलांची कामेही पूर्ण व्हायची आहेत. मजुरांची संख्या वाढवून उर्वरित कामे युद्धपातळीवर पूर्ण करा, अशा सूचना खरात यांनी उपस्थित अधिकारी आणि कंत्राटदारांना दिल्या.

२५ ते ३० तारखेदरम्यान उर्वरित कामे पूर्ण करून कालव्यातून पाणी सोडता येईल, अशी परिस्थिती निर्माण करण्याचे नियोजन आहे. पाहणीवेळी उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी तसेच खडकपूर्णा प्रकल्प आणि बुलढाणा पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!