spot_img
spot_img

दीड लाखांत लग्नाची बोलणी… दोन दिवसांत नववधू गायब! ‘दोन लाख देऊ’ म्हणत धाड पोलिसांनी रचला सापळा, संभाजीनगरात ठोकल्या बेड्या!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मोबाईलवर मुलीचा फोटो दाखवला. लग्न जुळवून देण्यासाठी दीड लाख रुपयांचा व्यवहार ठरला. देवस्थानात लग्नही झालं. पण अवघ्या दोन दिवसांत नववधू धामणगावच्या घरातून निघून गेली! लग्नाच्या नावाखाली फसवणूक झाल्याची तक्रार येताच धाड पोलिसांनी तपास सुरू केला. संशयित महिलेपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनीही लग्नाचीच बोलणी सुरू केली आणि तिला संभाजीनगरमध्ये अटक केली.

फिर्यादीनुसार, धामणगाव येथील मोहन राजाराम देवकर (२९) यांना अंढेरा, ता. देऊळगाव राजा येथील नारायण किसन आंधळे याने लातूरच्या सविता अण्णा सांगळे हिचा फोटो मोबाईलवर दाखवला. लग्न जुळवून देण्यासाठी दीड लाख रुपये देण्याचे ठरले. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी दुधा येथील श्री मर्दडी देवी संस्थानात दोघांचा विवाह झाला. मात्र, दोन दिवसांनी सविता घरातून निघून गेल्याने देवकर यांनी ६ सप्टेंबर रोजी धाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ६१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान देशमाने आणि सहायक फौजदार शांताराम जाधव यांनी तपास केला. पोलिसांनी आधी नारायण आंधळेला अंढेरा परिसरातून अटक केली. त्यानंतर सविता परळी वैजनाथ रेल्वे स्थानक परिसरात राहत असल्याची गोपनीय माहिती देशमाने यांना मिळाली.

‘लग्नासाठी मुलगा आहे, दोन लाख रुपये देऊ’, असं पोलिसांनी मोबाईलवरून सांगितलं. त्या बोलणीनंतर सविता संभाजीनगरला आली. तिथे ३ नोव्हेंबर रोजी देशमाने आणि जाधव यांनी तिला ताब्यात घेतलं. न्यायालयाने दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!