पिंपळगाव राजा (हॅलो बुलढाणा) सिद्धगंगा नदीपात्रातील पाण्यात १४ नोव्हेंबर रोजी दुपारी एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. हा मृतदेह पिंपळगाव राजा येथील रहिवासी मधुकर बोंबटकार यांचा असल्याची माहिती समोर आली आहे. बोंबटकार हे राज्य परिवहन महामंडळाच्या खामगाव आगारात बस वाहक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूचे वृत्त पसरताच पिंपळगाव राजा आणि पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
बोंबटकार नदीपात्रात कधी आणि कोणत्या परिस्थितीत पोहोचले? त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? या प्रश्नांची उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत. मृतदेह पाण्यात आढळल्याने मृत्यूच्या कारणाबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. शवविच्छेदन अहवाल आणि घटनास्थळाशी संबंधित पुराव्यांतून या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
खामगाव आगारातील आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूच्या वृत्ताने एसटी कर्मचारी वर्गातही हळहळ व्यक्त होत आहे. बोंबटकार शेवटचे कुठे दिसले आणि नदीपात्रात मृतदेह आढळण्यापूर्वी नेमकं काय घडलं, याचा उलगडा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता पोलीस तपासातून कोणती माहिती समोर येते, याकडे पिंपळगाव राजा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.













Total Users : 3760812