spot_img
spot_img

EXCLUSIVE! बाळापूरहून ट्रक विटांचा… पण साखरखेर्ड्याच्या बसस्थानकावर उतरलं काय? पिंजरा जप्त होताच खळबळ!

साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) बाळापूरहून विटा घेऊन येणाऱ्या ट्रकमधून साखरखेर्ड्याच्या बसस्थानकावर कुत्री उतरवून सोडल्याचा दावा काही नागरिकांनी केला आहे. गावात आधीच मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असताना समोर आलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली. प्रकार लक्षात येताच ग्रामपंचायतीने घटनास्थळी धाव घेत पिंजरा जप्त केला.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, एमएच ४० सीएम ७३७८ क्रमांकाच्या ट्रकमध्ये पिंजरा ठेवण्यात आला होता. ट्रक बसस्थानकावर आल्यानंतर त्यातून कुत्री सोडण्यात आल्याचे काहींनी पाहिले. प्रवाशांची ये-जा असलेल्या बसस्थानकाचीच निवड का करण्यात आली? नेमकी किती कुत्री आणली होती? ती कुठून पकडली आणि साखरखेर्ड्यात सोडायला कोणी सांगितले? आता या प्रश्नांची उत्तरे ग्रामपंचायतीला शोधावी लागणार आहेत.

पोलिसांचे पत्र आधीच, कारवाईचे काय?

मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी साखरखेर्डा पोलिसांनी ग्रामपंचायतीला यापूर्वीच पत्र दिले आहे. गल्लीबोळांत कुत्र्यांचा वावर वाढल्याने घराबाहेर पडतानाही धाकधूक वाटते, अशी गावकऱ्यांची तक्रार आहे. त्यात बाहेरून कुत्री आणून सोडल्याचा दावा समोर आल्याने पोलिसांच्या पत्रावर ग्रामपंचायतीने आजवर कोणती पावले उचलली, हाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पिंजरा जप्त झाला. आता तो ट्रकमध्ये कोणी चढवला, वाहन कुठून आले आणि बसस्थानकावर नेमके काय घडले, याचा छडा लागणे बाकी आहे. प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि ट्रकच्या फेरीची नोंद तपासल्यास घटनेचा क्रम स्पष्ट होऊ शकतो. हा एकदाच घडलेला प्रकार होता की यापूर्वीही अशा फेऱ्या झाल्या, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. गावात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कधी होणार आणि बसस्थानकावरील प्रकाराला जबाबदार कोण, या दोन्ही प्रश्नांची उत्तरे साखरखेर्ड्याला हवी आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!