डोणगाव (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी उभारलेला प्रकल्प चार वर्षे रखडला. दरम्यान, तुरीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री शेतात जावं लागत होतं. अखेर माजी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती राजेंद्र पाटील पळसकर यांनी प्रशासकीय दिरंगाईविरोधात आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर ३ नोव्हेंबरला काम पुन्हा सुरू झालं आणि आता मेहकर तालुक्यातील कऱ्हाळवाडी शिवारातील ६ मेगावाट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत २७ एकरांवर उभारलेल्या या प्रकल्पामुळे डोणगाव, पांगरखेड आणि मादणी येथील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तूर पीक वाचवण्यासाठी आतापर्यंत रात्रीच्या वीजपुरवठ्यावर अवलंबून राहावं लागत होतं. दिवसा सिंचन करता आल्याने शेतकऱ्यांची रात्रीची धावपळ कमी होईल, तसेच पाण्याची बचत होईल, अशी अपेक्षा आहे.
प्रकल्प सुरू झाल्याचा आनंद शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी पेढे वाटून साजरा केला. यावेळी उत्तमराव परमाळे, अकबर पठाण, संजय पळसकर, मुरली आण्णा आखाडे, अमोल धोटे, अरुण धांडे, शाम बाजड, सुरज दिनोरे, अमोल पळसकर, निलेश सदावर्ते, विशाल पळसकर, अबरार खान मिल्ली, कौसर ठेकेदार, अय्युब शाह, जुबेरोद्दीन यांच्यासह स्थानिक शेतकरी उपस्थित होते.













Total Users : 3756519