मलकापूर (हॅलो बुलढाणा) शहीद जवान संजयसिंह राजपूत यांच्या स्मारकाला अभिवादन झालं. वीरपत्नी सुषमाताई राजपूत यांनी हिरवी झेंडी दाखवली. अन् हजारो शेतकऱ्यांच्या ‘जय जवान, जय किसान’च्या घोषणांनी मलकापूर दुमदुमलं! क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या दुष्काळ संघर्ष यात्रेला १४ नोव्हेंबर रोजी मलकापुरातून दणक्यात सुरुवात झाली. माजी सैनिकांच्या उपस्थितीत नांगराचे पूजन करण्यात आले. प्रारंभीच्या सभेनंतर तहसील कार्यालयापर्यंत पायी रॅली काढण्यात आली.
‘पाच हजार रुपयांत दिवाळी होते का?’
हजारो शेतकऱ्यांसमोर हा सवाल करत रविकांत तुपकरांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. दुष्काळाची कल्पना वर्षभर आधी होती, तर सरकारने उपाययोजना का केल्या नाहीत, असा जाब त्यांनी विचारला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना क्षेत्रमर्यादेशिवाय हेक्टरी एक लाख रुपये आणि शेतमजूर व भूमिहीनांना प्रत्येकी एक लाख रुपये द्या, अशी मागणी त्यांनी केली.
‘दुष्काळ संपेपर्यंत एक रुपयाही देणार नाही!’
सक्तीच्या कर्जवसुलीवरूनही तुपकरांनी खासगी फायनान्स कंपन्यांना इशारा दिला. सरकारने कंपन्यांची बैठक घेऊन तोडगा काढावा, शेतकऱ्यांचे सिबिल खराब होऊ देऊ नये आणि सरसकट कर्जमुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली. प्रलंबित पीकविमा, शेतकऱ्यांना २४ तास वीज, जनावरांसाठी थेट दावणीला चारा आणि महिला बचतगटांना कर्जमाफी या मागण्याही त्यांनी मांडल्या. सोयापेंड आयातीला विरोध करत सोयाबीनला प्रतिक्विंटल १२ हजार आणि कापसाला १७ हजार रुपये भाव देण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली.
४ डिसेंबरला बुलढाण्यात ‘एल्गार महामोर्चा’
पुढील २१ दिवस तुपकरांचा ‘लोकरथ’ जिल्ह्यातील तेराही तालुक्यांतील गावांमध्ये पोहोचणार आहे. गावागावांत सभा घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. ४ डिसेंबरला बुलढाण्यात होणाऱ्या एल्गार महामोर्चात प्रत्येक घरातील शेतकरी आणि शेतमजुरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तुपकरांनी केले. नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात दुष्काळग्रस्तांना हेक्टरी एक लाखाची मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी करत “आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर नागपूरचं अधिवेशन कसं होतं तेच पाहू,” असा इशाराही त्यांनी दिला.













Total Users : 3756521