spot_img
spot_img

५५ लाख पात्र, यादीत २४ लाख… खात्यात पैसे फक्त १२ लाखांना! ‘हा शासनाचा नाकर्तेपणा नाही तर काय?’ सिंदखेडराजा तालुक्यात तीन गावांना रोहित पवारांची भेट. ‘मदतीसाठी अडवणूक होत असेल, तर थेट मला फोन लावा!’

सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) महाराष्ट्रात कर्जमाफीसाठी ५५ लाख शेतकरी पात्र असताना आतापर्यंत केवळ २४ लाख शेतकऱ्यांची नावे जाहीर झाली. त्यापैकीही फक्त १२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली. ‘हा शासनाचा नाकर्तेपणा नाही तर काय?’असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी रताळीत केला.

४ नोव्हेंबर रोजी पवार यांनी सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा, बामखेड आणि रताळी येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची घरी जाऊन भेट घेतली. रताळीत कर्जमाफीच्या यादीत गावातील अवघ्या ७० शेतकऱ्यांची नावे आल्याचा मुद्दा ग्रामस्थांनी मांडला. उर्वरित शेतकऱ्यांची नावे कधी जाहीर होणार आणि खात्यात पैसे कधी येणार, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. त्यावर राज्यातील कर्जमाफीची आकडेवारी मांडत पवारांनी सरकारवर टीका केली.

रताळीतील २४ वर्षीय आकाश बळीराम पाटील यांच्या कुटुंबाचे पवारांनी सांत्वन केले. कुटुंबाला आतापर्यंत कोणती मदत मिळाली आणि मदतीला विलंब का झाला, याची जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे विचारणा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मदत देताना कोणी अडवणूक करीत असेल, तर थेट मला फोन लावा,’ असेही त्यांनी कुटुंबीयांना सांगितले.

रात्री अकराला साखरखेर्ड्यात दुचाकीवरून भेटी

साखरखेर्ड्यात रात्री अकराच्या सुमारास पवार सरपंच अमित जाधव यांच्या दुचाकीवरून संतोष खरात आणि गोविंदराव बेंडमाळी यांच्या घरी पोहोचले. त्यांनी दोन्ही कुटुंबीयांची विचारपूस करून सांत्वन केले. दुष्काळी परिस्थितीत अडचणीत असलेल्या शेतकरी कुटुंबांना वेळेत मदत मिळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष नरेश शेळके, विधानसभा संपर्कप्रमुख सतीश काळे, दिनकरराव देशमुख, रामभाऊ जाधव, राजू ठोके, उमेश शेजूळ, अनिल तुपकर, सय्यद रफीक यांच्यासह शेतकरी आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!