जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) ग्रामपंचायतीचा हिशेब मागितला, तर उत्तर मिळालं, ‘माहिती उपलब्ध नाही’! दादुलगावच्या ग्रामस्थांनी २ नोव्हेंबरला थेट बुलढाणा जिल्हा परिषदेवर मशाल मोर्चा नेला. दुसऱ्याच दिवशी, ३ नोव्हेंबरला, जळगाव जामोदच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दादुलगावचे तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी विजय शंकर ढगे आणि अनिल सखाराम अंबडकार यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित केले. दोघांसाठी स्वतंत्र आदेश जारी करण्यात आले.
ढगे आणि अंबडकार हे दादुलगाव ग्रामपंचायतीत वेगवेगळ्या कालावधीत कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळातील अभिलेख ग्रामपंचायत स्तरावर ठेवले नसल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले, असे आदेशांत नमूद आहे. माहिती अधिकारात मागितलेली संपूर्ण माहिती नियमानुसार देण्यात आली नाही. कारणे दाखवा नोटिशींना दोघांनी दिलेले खुलासे समाधानकारक नसल्याचे नमूद करत निलंबनाची कारवाई करण्यात आली.
२०१६ पासूनच्या कथित अपहाराची चौकशी!
ग्रामस्थांनी २२ सप्टेंबरच्या तक्रारीत २०१६ पासून ग्रामपंचायतीत अपहार झाल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीवर वेळीच प्राथमिक चौकशी करून उपलब्ध माहिती तक्रारदारांना देणे अपेक्षित होते, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी गटविकास अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले. जिल्हास्तरावर चौकशी समिती गठित झाली असून, चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी ‘हॅलो बुलढाणा’ला दिली.
घरकुलातून वगळलेल्यांच्या घरी पोहोचणार अधिकारी!
यादीतून वगळलेल्या सर्व लाभार्थ्यांची त्रयस्थ अधिकाऱ्यामार्फत प्रत्यक्ष स्थळपाहणी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेने दिले आहेत. पाहणीत पात्र ठरणाऱ्यांचा घरकुल यादीत पुन्हा समावेश करण्यासाठी ग्रामपंचायतीला कार्यवाही करावी लागणार आहे. जिल्हा परिषदेने या कार्यवाहीचा अहवालही मागवला आहे.





Total Users : 3720435