spot_img
spot_img

चारा नाही, पाणी नाही… कळप जगवायचा कसा? जळगाव जामोदमध्ये मेंढपाळांचा तहसीलवर ‘हुंकार’! सात मागण्यांचे निवेदन; दुष्काळी मदत, चराई आणि नुकसानभरपाईसाठी शासनाला साकडे!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) दुष्काळाने चराई हिरावली, चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर केला; आता पारंपरिक व्यवसाय टिकवायचा कसा? या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी, २ नोव्हेंबर रोजी मेंढपाळांनी तहसील कार्यालयावर ‘हुंकार आंदोलन’ केले. तहसीलदार पवन पाटील यांना सात मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

डॉ. अर्जुन नामदेवराव महानर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाचे आयोजन पंजाबराव ज्योतीराम महानर यांनी केले. तातडीने शासकीय चारा छावण्या सुरू करा, मोफत चारा-पाणी, टँकर आणि विशेष आर्थिक मदत द्या, अशी मागणी आंदोलकांनी केली.

शासकीय, महसूल व पडीत जमिनीवर चराईची व्यवस्था, गावोगावी मोफत पशुवैद्यकीय उपचार, औषधे आणि लसीकरण उपलब्ध करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली. स्थानिकांच्या चराईवर परिणाम टाळण्यासाठी परराज्यातील मेंढपाळांच्या प्रवेशावर बंदी घालून धोरण निश्चित करावे, अशी मागणीही मांडण्यात आली.

वनविभागाकडून त्रास, मेंढ्या पकडणे, खोट्या तक्रारी आणि अवाजवी दंड आकारला जात असल्याचा आरोप निवेदनात आहे. हे प्रकार थांबवावेत, आपत्ती व दुष्काळामुळे पशुधनाचा मृत्यू झाल्यास नुकसानभरपाई द्यावी; वनचराई, विमा व पशुसंवर्धनविषयक निर्णयांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली.

निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून तातडीची कार्यवाही करावी, अशी विनंती करण्यात आली. आंदोलनात मेंढपाळ मोठ्या संख्येने सहभागी झाले. बंडू महानरही उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक गणेश कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त होता.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!