बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दिवाळी सणात गावी जाणाऱ्या नागरिकांच्या गर्दीचा फायदा घेऊन खाजगी ट्रॅव्हल्सकडून होणाऱ्या मनमानी भाडेवसुलीविरोधात उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बुलढाणा अखेर खडबडून जागे झाले आहे.
काल दि. ३० ऑक्टोबर रोजी RTO ने विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत ४८ खाजगी ट्रॅव्हल्सची तपासणी करण्यात आली. यात नियमात न बसणारे भाडे आकारणे आणि इतर त्रुटी आढळल्याने ९ ट्रॅव्हल्स चालकांवर कारवाई करत ५८,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शासनाने स्पष्ट केले आहे की, खाजगी कंत्राटी बसने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (S.T.) मार्गावरील टप्पा वाहतुकीची प्रथा बंद करावी आणि एस.टी.च्या भाड्याच्या ५०% पेक्षा जास्त भाडे आकारू नये.
राज्यभरात ९ ते २० नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहीम
परिवहन आयुक्त, मुंबई यांच्या आदेशानुसार दि. ०९ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राज्यभर ही विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. रघुवीरसिंग बिलावर यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक श्री. हरिष पवार, सौ. राजश्री चौधरी, श्री. आशिष इंगळे, श्री. जितेंद्र सोनवणे यांनी ही कारवाई केली.
▪️RTO चे नागरिकांना आवाहन!
जर आपल्या कडून जादा भाडे घेतले असेल तर जवळच्या RTO कार्यालयात लेखी तक्रार करा किंवा dyrto.28-mh@gov.in या ईमेलवर आपले नाव, बस क्रमांक, ट्रॅव्हल्सचे नाव, तिकीटाचा फोटोसह तक्रार पाठवा. सणासुदीत जादा भाडे आकारणे, वैध कागदपत्रांशिवाय (Fitness, PUC) गाडी चालवणे आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिला आहे.





Total Users : 3697216