लोणार (हॅलो बुलढाणा/राहुल सरदार) आर्थिक अडचणींमुळे डोळ्यांचे उपचार रखडलेल्या गरजूंसाठी लोणारमधील मोफत नेत्रतपासणी शिबिर दिलासादायक ठरले. नगरपरिषदेच्या गटनेत्या सौ. सिमाताई नितीन शिंदे आणि जालन्याच्या गणपती नेत्रालयाच्या संयुक्त उपक्रमात एक हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी झाली. यातील १२० रुग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून, त्यांच्यावर लवकरच जालना येथे शस्त्रक्रिया होणार आहेत.
डॉ. झाकीर हुसेन हायस्कूलमध्ये शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या शिबिरासाठी सकाळपासून नागरिकांनी गर्दी केली. तज्ज्ञ डॉक्टरांनी मोतीबिंदूसह डोळ्यांच्या विविध समस्यांची तपासणी करून पुढील उपचारांसाठी रुग्णांची निवड केली. केवळ तपासणीवर न थांबता शस्त्रक्रियेचीही व्यवस्था झाल्याने गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे.
नगराध्यक्षा सौ. मिराताई भूषण मापारी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. नागरिकांच्या आरोग्याची गरज ओळखून सिमाताई शिंदेंनी राबविलेला उपक्रम प्रशंसनीय असल्याचे त्यांनी सांगितले. नियमित आरोग्य तपासणी आणि वेळेवर उपचार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
उपक्रमाला उपाध्यक्ष आबेद खान पठाण, भूषण मापारी, डॉ. विक्रांत मापारी, पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांच्यासह सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी नोंदणीपासून तपासणीपर्यंत रुग्णांना सहकार्य केले. नितीन शिंदे यांनी सूत्रसंचालन केले; सिमाताई शिंदे यांनी आभार मानले.
हजारांवर नागरिकांपर्यंत पोहोचलेली आरोग्यसेवा आणि १२० रुग्णांसाठी उपलब्ध झालेली शस्त्रक्रियेची संधी हेच या उपक्रमाचे ठळक फलित ठरले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना पुढील उपचार मिळवून देण्यासाठी उचललेल्या या पावलाचे उपस्थितांनी कौतुक केले.





Total Users : 3696174