सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) दुष्काळाच्या झळांनी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी सिंदखेडराजा तहसील प्रशासनाने कामाचा वेग वाढवला आहे. पात्र शेतकऱ्यांना शासनाची पाच हजार रुपयांची मदत दिवाळीपूर्वी मिळावी, यासाठी शनिवार-रविवारच्या सुट्टीतही महसूल यंत्रणा काम करणार आहे.
उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे आणि प्रभारी तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे यांनी मदत वितरण प्रक्रियेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. लाभार्थ्यांच्या याद्या, माहितीची पडताळणी, कागदपत्रांतील त्रुटी आणि ऑनलाइन मंजुरीचा निपटारा करण्यासाठी अधिकारी-कर्मचारी कामाला लागले आहेत.
शनिवार, ३१ ऑक्टोबरला कार्यालयात काम सुरू असून रविवार, १ नोव्हेंबरलाही प्रक्रिया सुरू ठेवण्याची तयारी आहे. महसूल, कृषी आणि पंचायत विभागाच्या समन्वयातून गावपातळीवरील माहिती संकलित केली जात आहे. संदीप बंगाळे, नैसर्गिक आपत्ती शाखेतील सौ. रोकडे, संगणक परिचालक गणेश देशमुख यांच्यासह कर्मचारी यासाठी कार्यरत आहेत.
सामायिक खातेदारांनो, संमतीपत्र तातडीने द्या!
सामायिक जमिनीच्या अनुदानाची रक्कम कोणत्या सहहिस्सेदाराच्या खात्यावर जमा करायची, याचे संमतीपत्र संबंधितांनी तातडीने तहसील कार्यालयात सादर करावे, असे आवाहन डॉ. वराडे यांनी केले आहे. संमतीपत्र वेळेत मिळाल्यास वितरणातील अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे.
आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही मदत महत्त्वाची आहे. मात्र, याद्या आणि मंजुरीपलीकडे जाऊन प्रत्यक्ष खात्यात पैसे जमा झाल्यावरच दिलासा मिळणार आहे. प्रशासनाच्या या धावपळीचे रूपांतर दिवाळीपूर्वी मदतीत होते का, याकडे आता तालुक्यातील बळीराजाचे लक्ष लागले आहे.





Total Users : 3696173