बुलढाणा/मुंबई (वृत्तसंस्था/हॅलो बुलढाणा) प्रदीप जाधव आत्महत्या प्रकरणात विराज प्रोफाइल्सचे मुख्य परिचालन अधिकारी जे.पी. गर्ग यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. आत्महत्येच्या चिठ्ठीतील विशिष्ट आरोप आणि घटनेच्या दिवशी घेतलेल्या कथित हस्तलिखित राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर गर्ग यांची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे नोंदवत न्यायालयाने अटकपूर्व जामिनासाठीचे अपील फेटाळले. न्यायमूर्ती एन.आर. बोरकर यांनी २८ ऑक्टोबर रोजी हा निर्णय दिला.
बुलढाण्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय जाधव यांचे बंधू प्रदीप जाधव हे बोईसर एमआयडीसीतील विराज प्रोफाइल्समध्ये वरिष्ठ कार्यकारी पदावर कार्यरत होते. त्यांनी १९ जून २०२६ रोजी आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी न्यायाची मागणी लावून धरली आहे.
चिठ्ठी आणि राजीनाम्यावर तपासाचा रोख!
गर्ग यांच्याकडून वारंवार छळ व अपमान होत असल्याचे आरोप जाधव यांच्या चिठ्ठीत आहेत. घटनेच्या दिवशी व्यवस्थापकीय संचालकांच्या बंगल्यावर जाधव यांना बोलावण्यात आले होते. त्यावेळी गर्ग उपस्थित होते आणि जाधव यांच्याकडून हस्तलिखित राजीनामा घेण्यात आल्याचे न्यायालयाने नोंदवले. गर्ग यांच्या वकिलांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध करणारे साहित्य नसल्याचा युक्तिवाद केला; मात्र न्यायालयाने जामीन नाकारला.
“पतीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा द्या!”
पत्नी वंदना जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. गर्ग यांना तात्काळ अटक करावी, अशी कुटुंबीयांची मागणी आहे. कंपनीचे नीरज कोचर गर्ग यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी गर्ग यांना आधीच्या अंतरिम आदेशाचे संरक्षण निर्णयापासून दहा दिवस कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जामीन फेटाळल्याबरोबर तात्काळ अटकेचा मार्ग मोकळा झालेला नाही जाधव कुटुंबीयांचा न्यायासाठीचा लढा सुरू असून, पुढील तपास आणि न्यायालयीन कार्यवाहीकडे आता लक्ष लागले आहे.





Total Users : 3694432