शेगाव (हॅलो बुलढाणा) पूर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्तीच्या मागणीसाठी शेगावचे माजी नगराध्यक्ष शिवाजी बुरुंगले आणि शैलेंद्र पाटील यांनी शुक्रवारी गांधी चौकातील नगरपरिषद कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले. तातडीने नियुक्ती करा, अन्यथा आमरण उपोषण करू, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
‘ब’ वर्ग नगरपरिषद असलेल्या शेगावात २८ सप्टेंबरपासून पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. जळगाव जामोदचे मुख्याधिकारी जाधव यांच्याकडे अतिरिक्त पदभार आहे. मात्र, अधिकाऱ्यांना पुरेसा वेळ देता येत नसल्याने नागरिकांची कामे खोळंबत असून विकासकामांनाही फटका बसत असल्याचा आरोप त्यांनी केला.
१५ ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज देऊनही नियुक्तीबाबत कार्यवाही झाली नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. निवडणूक आयोगाची महत्त्वाची कामे सुरू असताना अतिरिक्त पदभारावर कारभार किती दिवस चालवणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पूर्णवेळ मुख्याधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती करून प्रशासन सुरळीत करावे आणि विकासकामांना गती द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनाला शहरातील सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.





Total Users : 3687926