चिखली (हॅलो बुलढाणा/सैय्यद साहिल) भरलेली टाकी वाहतेय, नळ गळतोय आणि वाहने धुण्यासाठी पाण्याचा मारा सुरू आहे! ही बेफिकिरी चिखलीच्या जलसुरक्षेला महागात पडू शकते. अल्प पाऊस आणि खालावणाऱ्या भूजल पातळीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी नागरिकांना प्रत्येक थेंब जपण्याचे आवाहन केले आहे.
शहरातील विहिरी, बोअरवेल आणि जलस्रोतांमधील पाणी कमी होत असल्याचे देशमुख यांनी सांगितले. उपलब्ध साठ्यावर ताण वाढत असताना पाण्याचा अनावश्यक वापर सुरू राहिल्यास आगामी पाणीपुरवठ्याची चिंता गंभीर होऊ शकते.
बोअरवेल खासगी असली, तरी भूजल हा संपूर्ण समाजाचा ठेवा आहे. बेसुमार उपसा सुरू राहिल्यास अनेक बोअरवेल कोरड्या पडण्याचा धोका असल्याचा इशाराही त्यांनी दिला. आपल्या घरात पाणी येते म्हणून शहराच्या संकटाकडे पाठ फिरवण्याची वृत्ती सोडावी लागेल.
टाकी भरताच पाणी बंद करा, गळके नळ आणि पाइपलाइन दुरुस्त करा. वाहने, अंगण आणि रस्ते धुण्यासाठी पाण्याची उधळण टाळा. मुलांनाही पाणी बचतीची सवय लावा.
नगरपालिका पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे; मात्र नागरिकांच्या सहकार्याशिवाय संकटाची तीव्रता कमी करणे कठीण असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. पावसाचे पाणी साठविण्यासाठीही पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
दुष्काळाची झळ बसल्यावर धावपळ करण्यापेक्षा आजच कृती हवी. बंद केलेली प्रत्येक तोटी, रोखलेली प्रत्येक गळती शहराच्या भविष्यासाठी मोलाची आहे. पाणी बचत प्रत्येक घराची जबाबदारी बनायला हवी!





Total Users : 3670696