देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) सणासुदीच्या तोंडावर मसाल्याच्या आस्थापनांत नेमकं चाललंय काय? देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळनेर येथे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या धडक कारवाईत गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. अस्वच्छता, मांजरं-कबुतरांसह कीटकांचा वावर आणि अन्नपदार्थ थेट जमिनीवर ठेवण्याचे प्रकार तपासणीत आढळल्याची माहिती आहे. या कारवाईत एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचा मसाला जप्त करण्यात आला असून, दोन आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
मे. जनता सेवा मिरची मसाला इंडस्ट्रीज आणि मे. अनोखे फुड्स अँड स्पाइसेस या दोन मसाला उत्पादक आस्थापनांवर एफडीएने कारवाई केली. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांची तपासणी सुरू असतानाच प्रशासनाचा मोर्चा मसाला उत्पादकांकडे वळला आणि उत्पादनस्थळांवरील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला.
तपासणीमध्ये केवळ अस्वच्छताच नव्हे, तर कीटक नियंत्रणाचा अभावही आढळून आला. कामगारांच्या वैद्यकीय तपासणीचा अभाव आणि अन्नपदार्थांच्या चाचणी अहवालांची अनुपलब्धता अशा त्रुटीही निदर्शनास आल्या. ग्राहकांच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचणाऱ्या पदार्थांच्या उत्पादनात आवश्यक काळजी घेतली जात होती का, असा गंभीर सवाल या निष्कर्षांमुळे उपस्थित झाला आहे.
मसाल्याला चव हवी; पण उत्पादनस्थळी स्वच्छतेची जबाबदारी कुणाची? मांजरं, कबुतरं आणि कीटकांचा वावर असताना अन्नपदार्थांची हाताळणी कशी होत होती? पदार्थ जमिनीवर का ठेवले होते? आवश्यक तपासण्यांचे अहवाल उपलब्ध का नव्हते? एफडीएच्या कारवाईनंतर या प्रश्नांची उत्तरे महत्त्वाची ठरणार आहेत.
एक कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त होणे आणि दोन्ही आस्थापनांचे परवाने निलंबित होणे, यामुळे मसाला व्यवसायातील स्वच्छतेच्या निकषांकडे दुर्लक्ष करण्याचा मुद्दा ठळकपणे पुढे आला आहे. सणासुदीत मागणी वाढत असताना उत्पादन वाढवण्याइतकीच स्वच्छता आणि आवश्यक नोंदी राखण्याची जबाबदारीही उत्पादकांची आहे.
या कारवाईने मसाला व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, ग्राहकांच्या दृष्टीने मुद्दा केवळ जप्तीच्या आकड्याचा नाही; त्यांच्या ताटात जाणाऱ्या अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेचा आहे. आढळलेल्या त्रुटींची दुरुस्ती आणि नियमांचे पालन याकडे आता लक्ष राहणार आहे





Total Users : 3663089