जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या पैशांवर चोरट्याने डल्ला मारला! शहरातील खेर्डा वेस परिसरातील हनुमान मंदिराची दानपेटी फोडून अंदाजे १० हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. चोरटा रोकडीवरच थांबला नाही; दानपेटीवरील हनुमान मंदिराचे छायाचित्रही चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मारोती संस्थानचे अध्यक्ष सुनील रजपालसिंग रघुवंशी हे २४ ऑक्टोबरला सायंकाळी सातच्या सुमारास मंदिरात पूजा आणि आरती करून घरी परतले. मंदिराचे पुजारी बाहेरगावी असल्याने त्यांनी पूजेची जबाबदारी पार पाडली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी सकाळी सात वाजता दानपेटी फोडल्याची माहिती त्यांना मिळाली.
रघुवंशी यांनी मंदिरात धाव घेऊन पाहणी केली असता दानपेटी फोडलेली आढळली. त्यातील जमा रोकड गायब होती. सायंकाळच्या आरतीनंतर ते सकाळपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाल्याचे समोर आले. श्रद्धेच्या ठिकाणालाही चोरट्याने लक्ष्य केल्याने मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रघुवंशी यांच्या तक्रारीवरून २५ ऑक्टोबर २०२६ रोजी जळगाव जामोद पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय वेरूळकर करीत आहेत





Total Users : 3663090