spot_img
spot_img

विमा दुचाकीचा… कागदावर उभा केला ट्रक? समन्स आले अन् पॉलिसीतील ‘खेळ’ समोर आला! बनावट कागदपत्रांतून आर्थिक फायद्याचा प्रयत्न केल्याचा आरोप; जळंब पोलिसांत चालकाविरुद्ध गुन्हा!

शेगाव (हॅलो बुलढाणा) दुचाकीसाठी काढलेली विमा पॉलिसी आयशर ट्रकची असल्याचे भासवून विमा कंपनीकडून आर्थिक फायदा मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधीच्या तक्रारीवरून नागपूर येथील चालक महेश किसनलाल चौधरी (वय ३०) याच्याविरुद्ध जळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजून ५८ मिनिटांनी गुन्हा क्रमांक ३४५/२०२६ नोंदविण्यात आला. भारतीय दंड संहितेच्या कलम ४१७, ४६५, ४६७ आणि ४७० अंतर्गत ही नोंद करण्यात आली आहे.

समन्स आले… अन् पॉलिसीतील तफावत समोर आली!

कंपनीचे प्रतिनिधी धिरेंद्रकुमार विनोद मिश्रा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील मोटार अपघात दावा प्राधिकरणातील दावा क्रमांक ७५६/२०२३ संदर्भात कंपनीला समन्स मिळाले होते. कंपनीने वकिलामार्फत प्रकरणाची कागदपत्रे प्राप्त करून पडताळणी केली असता, मूळ पॉलिसी आणि दाव्यातील कागदपत्रांमध्ये वाहनाच्या प्रकाराबाबत विसंगती आढळल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

कंपनीच्या नागपूर कार्यालयातून एमएच ४० सीडी ३८४२ या क्रमांकाच्या दुचाकीसाठी विमा पॉलिसी काढण्यात आली होती. तिची मुदत १६ मे २०२३ ते १५ मे २०२४ अशी होती. मात्र, प्राधिकरणात सादर कागदपत्रांत हीच पॉलिसी आयशर ट्रकसाठी असल्याचे दर्शविण्यात आल्याचा आरोप आहे.

कागदपत्रांचा आधार घेत आर्थिक फायद्याचा डाव?

संबंधित ट्रकची पॉलिसी आपल्या कार्यालयातून जारी करण्यात आलेली नव्हती, असे कंपनीचे म्हणणे आहे. याबाबत कंपनीने अपघात दावा प्राधिकरणासमोर वकिलामार्फत लेखी म्हणणेही सादर केले होते.

चौधरी याने स्वतःचा आर्थिक फायदा आणि कंपनीचे नुकसान करण्याच्या उद्देशाने खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे भासविल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या तक्रारीवरून आता फसवणूक व बनावट कागदपत्रांशी संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दुचाकीच्या विम्याची कागदपत्रे ट्रकच्या दाव्यात कशी पोहोचली? वाहनाचा प्रकार बदलल्याचे कसे दाखविण्यात आले? या प्रकरणातील कागदपत्रांची साखळी उलगडणे महत्त्वाचे ठरणार आहे. गुन्हा दाखल झाल्याने आता या आरोपांच्या चौकशीतून नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची अपेक्षा आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!