लोणार (हॅलो बुलढाणा/राहुल सरदार) लोणारच्या ऐतिहासिक कमळजा माता मंदिरासह हजरत गैबनशाह वली दर्गा आणि ११ प्राचीन मंदिरांना पाण्याचा विळखा पडल्याने निर्माण झालेला गंभीर प्रश्न अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनापर्यंत पोहोचला! पाच दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणात आमदार सिद्धार्थ खरात यांनी थेट हस्तक्षेप करत विभागीय आयुक्तांशी संपर्क साधला. त्यांच्या मध्यस्थीनंतर प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
पाच दिवसांचा संघर्ष; खरातांच्या पुढाकाराने चर्चेला गती!
काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश मापारी, विकास (माऊली) मोरे, साहेबराव पाटोळे, सुरेश वाठोरे आणि गोपी आखाडे यांनी मंदिरांमध्ये शिरणाऱ्या पाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी उपोषण सुरू केले होते. नवरात्रोत्सवात हजारो भाविकांना दर्शनासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत होता.
उपोषण मंडपातूनच विभागीय आयुक्तांना फोन!
प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार सिद्धार्थ खरात यांनी उपोषण मंडपातूनच विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीवर चर्चा केली. आंदोलकांच्या मागण्या थेट वरिष्ठ प्रशासनापर्यंत पोहोचवल्या. त्यानंतर १४ ऑक्टोबरला संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. या मध्यस्थीमुळे आंदोलनकर्ते आणि प्रशासन यांच्यातील संवादाला निर्णायक गती मिळाली.
वनविभागाचे लेखी आश्वासन; प्रस्ताव दिल्लीच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत!
१५ ऑक्टोबरच्या पत्रानुसार, सरोवरात येणाऱ्या गोड्या पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी ‘वॉटर लिफ्टिंग’चा तांत्रिक प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन वनविभागाने दिले.
उपोषण सुटले; आता प्रत्यक्ष काम कधी?
आमदार खरात यांच्या मध्यस्थीने पाच दिवसांचे उपोषण संपले असले, तरी मंदिरांच्या संरक्षणाचा प्रश्न अद्याप पूर्णतः सुटलेला नाही. आता अंतिम मंजुरी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी किती वेगाने होते, याकडे लोणारकरांसह हजारो भाविकांचे लक्ष लागले आहे.






Total Users : 3611977