जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) जळगाव जामोदखेर्डा मार्गावर शेतात वडिलांसाठी जेवणाचा डबा घेऊन जाणाऱ्या दशरथ उर्फ अरुण आत्माराम राऊत यांच्या दुचाकीला समोरून आलेल्या वाहनाने जोरदार धडक दिली. राऊत गंभीर जखमी झाले; मात्र वाहनचालक घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती आहे. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. आता अपघातातील वाहन सापडल्यानंतर जबाबदारांवर नेमकी काय कारवाई होणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबरच्या रात्री १० ते ८ ऑक्टोबरच्या सकाळी ६ या कालावधीत माजी आमदार कृष्णराव इंगळे यांच्या शेताजवळ अपघात घडला. राऊत MH 28 Q 9359 क्रमांकाच्या स्प्लेंडरवरून जात होते. वडिलांसाठी डबा घेऊन निघालेला मुलगा घरी परतलाच नाही; या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
फरार वाहनाचा माग काढण्यासाठी पोलीस हेडकॉन्स्टेबल रविकांत बावस्कर यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीचे धागे जोडले. अखेर १२ ऑक्टोबरला MH 46 BA 3568 क्रमांकाची महिंद्रा XUV शोधून पोलीस ठाण्यात आणण्यात आली. वाहनाचा पुढील भाग मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त असल्याचे सांगण्यात येते.
अपघातानंतर हे वाहन जेसीबीच्या मदतीने टोचन करून हलविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वाहनचालक दीपक गजानन भोंगाळे आणि मालक गणेश भोंगाळे, दोघे रा. रुधाना, ता. संग्रामपूर, यांची नावे या प्रकरणात समोर आली आहेत.
चालकासह वाहनमालकाविरोधात गुन्हा दाखल करावा, तसेच वाहन हलविणाऱ्या जेसीबी चालकाच्या भूमिकेची चौकशी करावी, अशी राऊत कुटुंबीयांची मागणी आहे. संबंधित वाहनचालकाला सूचना पत्र देऊन सोडल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, गुन्हा नोंदणी आणि कारवाईबाबत अधिकृत पोलीस माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.वाहन सापडले; पण राऊत कुटुंबाला न्याय कधी मिळणार?ठाणेदार सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली बावस्कर पुढील तपास करीत आहेत.






Total Users : 3602476