बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरावर पाणीटंचाईचे मोठे संकट घोंघावत आहे. यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने येळगाव धरणात ऑक्टोबरमध्येच केवळ 80% पाणीसाठा उरला आहे. गेल्यावर्षी याच वेळी 100% साठा होता. तर खडकपूर्णात फक्त 10% पाणी शिल्लक आहे,अशी माहिती आमदार संजय गायकवाड यांनी ‘हॅलो बुलढाणा ला’ दिली.
ते म्हणाले की, पाणीटंचाईच्या या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवक, पाणीपुरवठा विभाग, लाईनमन, वॉलमन आणि ठेकेदारांची महत्वाची बैठक पार पडली आहे.बैठकीतील 5 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान “शेतीपेक्षा माणसं जगवणं महत्वाचं आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे. अंघोळ, दाढी, ब्रश करताना नळ सुरू ठेवू नये.” असे आव्हान देखील गायकवाड यांनी केले.
▪️असे आहेत निर्णय..!
1) दिवाळीपर्यंत लिकेजमुक्त शहर: शहरातील 160 कोटींची योजना ठेकेदाराच्या दिरंगाईने फेल गेली आहे. अनेक ठिकाणी वॉल्व्हच नाहीत, त्यामुळे 2 ते 2.5 तास पाणी वाया जाते. दिवाळीपर्यंत सर्व गळती आणि वॉल्व्हची कामे पूर्ण करणार. 20 जणांची विशेष टीम आजपासून कामाला.
2) 11 महिन्याचे नियोजन: ऑक्टोबर 2025 ते ऑगस्ट 2026 या 11 महिन्यांसाठी काटकसरीचे नियोजन. येळगाव धरण परिसरात 34 बोरवेल क्रश आणि 5-6 नवीन विहिरी खोदून पाणी वाढवणार.
3) वेळापत्रक जाहीर होणार: पाणीपुरवठ्याचे नवीन वेळापत्रक अभियंता ज्ञानेश्वर पवार हे WhatsApp आणि पेपरद्वारे जाहीर करतील. प्रत्येक झोनमध्ये MSEB अधिकारी सोबत असणार, जेणेकरून तांत्रिक बिघाड तात्काळ दुरुस्त होईल.
4) पाणीचोरीवर कारवाई: येळगाव धरणाच्या 500 मीटर परिसरातील शेतीसाठीचा पाणी उपसा पूर्णपणे बंद. कलेक्टर यांच्यासोबत निर्णय झाला असून सर्व मोटारी जप्त आणि MSEB लाईन कट केली जाणार आहे.
5) बांधकामांवर बंदी: नोव्हेंबरपासून खाजगी बांधकामांना पाणीपुरवठा बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.






Total Users : 3599013