बुलडाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील व्यापारी पेठेत असलेल्या डीएसईडी मॉलमधून एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. ज्या कर्मचाऱ्यावर विश्वास टाकून फर्मची सर्व आर्थिक जबाबदारी सोपवली, त्याच महिला कर्मचाऱ्याने तब्बल १० लाख ४८ हजार ५४५ रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने शहरातील फर्म चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील ‘ॲक्सिक्लॉन सोल्युशन्स’ ही फर्म पाण्याचे नमुने तपासण्याचे काम करते. पिण्याच्या पाण्यासह विविध कंपन्यांचे ड्रिंकिंग वॉटरचे सॅम्पल तपासून त्याचा रिपोर्ट देणे, हे या फर्मचे मुख्य काम आहे. या फर्ममध्ये अंजली सुभाष गवई (रा. काँग्रेस नगर, बुलढाणा ) ही महिला कर्मचारी कामाला होती. फर्ममधील ग्राहकांचा डेटा, कोटेशन, ई-मेल आयडी आणि आर्थिक व्यवहाराची सर्व माहिती तिच्याकडेच होती. फिर्यादी योगेश सिंगसकर (वय ३६, रा. तुळशी नगर, बुलडाणा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अंजली गवई हिने फर्मच्या ग्राहकांकडून येणारी रक्कम फर्मच्या खात्यावर जमा न करता, ती टप्प्याटप्प्याने स्वतःच्या वैयक्तिक विविध बँक खात्यात वळती केली.
हा प्रकार एक-दोन दिवसांचा नाही, तर तब्बल दीड महिना सुरु होता. दि. २३ जून २०२५ ते २९ जुलै २०२५ या कालावधीत तिने ही अफरातफर केली.
▪️असा आला उघडकीस प्रकार!
फर्मच्या हिशोबात तफावत जाणवू लागल्याने मालकाने ऑडिट केले. त्यावेळी ग्राहकांनी दिलेली रक्कम फर्मच्या खात्यात जमा न झाल्याचे लक्षात आले. चौकशी केली असता, हा सर्व पैसा अंजली गवई हिच्या खात्यात गेल्याचे निष्पन्न झाले. अखेर नाईलाजाने योगेश सिंगसकर यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून अंजली सुभाष गवई हिच्याविरुद्ध अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
▪️पोलिसांसमोर आव्हान!
आरोपी महिला ही उच्चशिक्षित असून तिने अत्यंत चलाखीने ई-मेल आणि डेटा वापरून हा गुन्हा केला आहे. त्यामुळे पोलिसांना आता तिचे बँक व्यवहार, ई-मेल ट्रेल तपासावे लागणार आहेत. शहरात अशा प्रकारे डेटाचा गैरवापर करून होणारी ही पहिलीच मोठी घटना असल्याने पोलिसही चक्रावले आहेत.






Total Users : 3598812