बुलढाणा, १२ ऑक्टोबर (हॅलो बुलढाणा) वैविध्यपूर्ण उपक्रमांतून बुलढाणा जिल्हा परिषदेला राज्यभर वेगळी ओळख मिळवून देणारे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांची बदली झाली आहे. दोन वर्षे दोन महिन्यांच्या कार्यकाळानंतर जिल्हा परिषदेच्या नेतृत्वाची धुरा आता भालचंद्र चव्हाण यांच्याकडे जाणार आहे. मुंबई येथे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागात संचालक म्हणून कार्यरत असलेले चव्हाण बुलढाण्याचे नवे सीईओ म्हणून पदभार स्वीकारतील.
खरात यांच्या बदलीचे आदेश सुभाष उमराणीकर यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहेत. मात्र, खरात यांना पुढील नियुक्ती अद्याप देण्यात आलेली नाही. त्यांना जिल्हाधिकारी म्हणून संधी मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली असून, त्याबाबत अधिकृत आदेशाची प्रतीक्षा आहे.
संवेदनशील आणि कलासक्त अधिकारी अशी ओळख असलेल्या खरात यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविले. जिल्हा परिषदेच्या कामकाजाला प्रगतीपूरक दिशा देण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यकाळात झाला.
आता नेतृत्व बदलत असताना प्रश्न केवळ नव्या अधिकाऱ्याच्या आगमनाचा नाही; सुरू असलेल्या उपक्रमांचे पुढे काय होणार, हा आहे. शिक्षणातील प्रगतीची गती कायम ठेवणे आणि ग्रामीण जनतेच्या प्रश्नांवर ठोस काम करणे, ही नव्या सीईओंसमोरील कसोटी ठरणार आहे.खुर्चीवर नवा अधिकारी येईल; पण गावागावांतील अपेक्षांना कृतीतून उत्तर मिळणार का? चव्हाण यांच्या कारभाराकडे आता जिल्ह्याचे लक्ष असेल!






Total Users : 3599013