बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पहाटेपासून घराघरांत बातम्या पोहोचवणारे हात आज स्वतःच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले! वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी मंजूर केलेले कल्याणकारी महामंडळ तातडीने कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी, ९ ऑक्टोबर रोजी बुलढाण्यात शेकडो विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. रखरखत्या उन्हातही विक्रेत्यांचा निर्धार कायम होता. जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या राज्यव्यापी आंदोलनांतर्गत जयस्तंभ चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर करून मुख्यमंत्र्यांपर्यंत मागण्या पोहोचवण्याची विनंती केली.
ऊन, वारा, पाऊस आणि थंडी झेलत वर्षभर वृत्तपत्र वितरण करणाऱ्या विक्रेत्यांच्या पदरी प्रतीक्षाच का? तब्बल १६ ते १७ वर्षांच्या संघर्षानंतर महामंडळाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झालेली नाही, असे संघटनेने निवेदनात नमूद केले. मंजुरीनंतरही प्रक्रिया कुठे अडकली, असा सवाल आंदोलनातून उपस्थित करण्यात आला.
महामंडळ तातडीने सुरू करून या कष्टकरी, असंघटित घटकाला न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली. लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने झालेल्या या आंदोलनाने शासनाचे लक्ष विक्रेत्यांच्या प्रश्नांकडे वेधले.
मोर्चात जिल्हाध्यक्ष राजेंद्र टिकार, उपाध्यक्ष संजय स्वामी, सचिव गजानन सरकटे, कोषाध्यक्ष माधव देशमुख, विभागीय सचिव प्रकाश उन्हाळे, विशाल एडसकर, प्रसिद्धीप्रमुख संतोष गाडेकर यांच्यासह जिल्हाभरातील विक्रेते सहभागी झाले.




Total Users : 3587212