बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सागवान तोडला, लाकूड जप्त झाले, आरोपीही कोठडीत गेले… पण जंगलाच्या रखवालदारांच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित झाल्याने घाटबोरीतील वृक्षतोड प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले यांनी स्वतःवरील कारवाई टाळण्यासाठी राहुल सूरदास मेहेत्रे याला ‘बळीचा बकरा’ बनवल्याचा आरोप पुढे आला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
वनविभागाच्या माहितीनुसार, २ ऑक्टोबरला भोसा बिटमधील कक्ष क्रमांक १८१ मध्ये १०३ सागवान झाडांची तोड आढळली. तपासात लगतच्या ई-क्लास जमिनीवरील आणखी २९ झाडांची तोड उघड झाली. दोन्ही ठिकाणांहून एकूण ३९५ सागवान गोल नग, अर्थात २५.४२५ घनमीटर लाकूड जप्त करण्यात आले. चेन सॉ आणि वाहनही ताब्यात घेण्यात आले. मुख्य आरोपीच्या चौकशीत आणखी चार जणांची नावे निष्पन्न झाल्याचे वनविभागाने सांगितले आहे.
कारवाई झाली; पण अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी कोण करणार?
येवले यांनी आर्थिक देवाणघेवाणीतून वृक्षतोड करणाऱ्यांना अप्रत्यक्ष सहकार्य केल्याचा आरोप तक्रारीच्या कथनात करण्यात आला आहे. महिला वनरक्षक सौ. एम. के. मोरे यांनी डोनगाव पोलिसांकडे दिलेल्या रिपोर्टमध्ये लाकूडतोड्यांना अधिकाऱ्यांचे अभय असल्याचा आरोप केल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित रिपोर्टची प्रत आणि त्यावरील पोलिसांची भूमिका अद्याप उपलब्ध नाही.
दरम्यान, सुमारे ५० लाखांच्या सागवानाचे चार ट्रक समृद्धी महामार्गाने नागपूरकडे गेल्याची परिसरात चर्चा दबक्या आवाजात असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. हे ट्रक खरोखर गेले का? टोल नोंदी आणि सीसीटीव्हीत काय दिसते? याची पडताळणी झाली का?
पत्रकार देविदास गोविंदा खंडारे यांच्यासह नागरिकांनी खातेनिहाय चौकशीची मागणी केल्याचे सांगण्यात आले आहे. अधिकृत वृत्तातील कक्ष क्रमांक १८१ आणि आरोपांतील बीट क्रमांक ४३२ यांचाही खुलासा आवश्यक आहे.जप्तीपलीकडील सत्य उघड करण्यासाठी स्वतंत्र चौकशी होणार का? येवले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांची प्रतिक्रिया उपलब्ध झाल्यानंतर प्रसिद्ध केली जाईल.




Total Users : 3578330