सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) शेतकरी पीक कर्ज मागतोय, अनावश्यक कागदपत्रांसाठी हेलपाटे नाही! आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर आणि अतिरिक्त कागदपत्रांसाठी धावपळ करावी लागत असल्याच्या तक्रारींची अखेर प्रशासनाने दखल घेतली आहे. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी तातडीने प्रतिसाद देत संबंधित बँकांना स्टॅम्प पेपरची सक्ती आणि अनावश्यक कागदपत्रांची मागणी करू नये, असे लेखी निर्देश दिल्याची माहिती आहे.
पालकमंत्री मकरंद पाटील यांनी यापूर्वीही स्टॅम्प पेपरची अट घालू नये, अशा सूचना दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. तरीही काही बँकांमध्ये शेतकऱ्यांची धावपळ सुरू असल्याच्या तक्रारी कायम होत्या. आदेश मिळालेला नाही, असे सांगितले जात असल्याने संभ्रमही वाढला होता. मग शेतकऱ्यांनी कर्जासाठी बँकेत जावे की आदेश शोधण्यासाठी कार्यालयात फिरावे?
‘हॅलो बुलढाणा’चे सिंदखेडराजा प्रतिनिधी वसीम शेख यांनी गेल्या दोन-तीन दिवसांत हा प्रश्न प्रा. खडसे यांच्या निदर्शनास आणला. स्टॅम्प, शपथपत्र आणि प्रवासाचा खर्च शेतकऱ्यांच्या खिशावर अतिरिक्त भार टाकत असल्याचे त्यांनी मांडले.
या तक्रारीकडे संवेदनशीलतेने पाहून प्रा. खडसे यांनी केलेली तातडीची कार्यवाही कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांची अडचण समजून प्रशासनाने वेळीच पाऊल उचलल्याने दिलाशाची अपेक्षा निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार आणि बँक अधिकाऱ्यांशी चर्चा करून ७ ऑक्टोबर रोजी संबंधित शाखांना लेखी निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, देऊळगाव मही, साखरखेर्डा, मलकापूर पांग्रा यांसह परिसरातील संबंधित बँक शाखांना हे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.
आधीच पावसाची अनिश्चितता, पिकांचे नुकसान आणि आर्थिक अडचणींनी शेतकरी हैराण आहे. अशावेळी कर्ज प्रक्रियेतील अनावश्यक अडथळे दूर करणे ही गरज आहे. वसीम शेख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने हा प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचला आणि कार्यवाहीला गती मिळाली.
आता खरी कसोटी बँकांची!
निर्देश प्रत्येक शाखेपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. ‘पत्र आले नाही’ या उत्तरामुळे शेतकऱ्यांची पुन्हा फरफट होऊ नये. प्रशासनानेही अंमलबजावणीवर लक्ष ठेवावे.उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसेंच्या तत्परतेचा खरा सन्मान तेव्हाच होईल, जेव्हा कर्जासाठी आलेला शेतकरी अनावश्यक हेलपाट्यांशिवाय पुढची प्रक्रिया पूर्ण करेल!




Total Users : 3572925